
अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे. २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅन्टीनवर एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर शहरातील सहा हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि अन्न उत्पादन आस्थापनांचे अन्न परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कॅन्टीनची तपासणी करताना रेफ्रिजरेटरमध्ये अन्नपदार्थांची अयोग्य आणि अव्यवस्थित साठवणूक आढळली, ज्यामुळे अन्नपदार्थांच्या परस्पर दूषितीकरणाचा धोका निर्माण झाला होता.
साठवणूक क्षेत्राजवळ उघड्या आणि कचऱ्याने भरलेल्या कचरापेट्या ठेवण्यात आल्या होत्या, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेची साधने ठेवण्यात आली होती, तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ग्लोव्हज आणि संरक्षक कपडे परिधान केले नव्हते. अन्नपदार्थांची योग्य विभागणी करण्यात आली नव्हती, भांडी थेट जमिनीवर ठेवण्यात आली होती आणि स्वयंपाकगृहात पादत्राणे घालण्यात येत होती. याशिवाय स्वयंपाकगृहातील फरशी खराब होती, ड्रेनेजची झाकणे उघडी होती, खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळी नव्हती, अपुऱ्या शिजवणुकीमुळे गरम ठेवणे व थंड साठवणूक योग्य पद्धतीने केली जात नव्हती आणि अन्नपदार्थांची खरेदी नोंदी, तसेच अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीच्या अंतर्गत आणि बाह्य लेखापरीक्षणासंबंधी आवश्यक अभिलेख उपलब्ध नव्हते. विशेष म्हणजे या कॅन्टीनमध्ये वैध अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी नसल्याचेही आढळले.
मुंबई : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जुहू येथील रहिवासी धर्मेंद्र सिंग याला अटक ...
याशिवाय बोरिवली पूर्व येथील मराठा चिकन सप्लायर्स, गोवंडी पूर्व येथील व्हेल्वेट फाईन चॉकलेट्स, गोवंडी येथील शाने-इलाही बेकरी अँड स्टोअर, लोअर परळ येथील ब्रिटिश ब्रुइंग कंपनी, प्रभादेवी येथील क्रस्टो'ज चीज बर्स्ट पिझ्झा बाय ओलिओ आणि वरळी येथील द नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया या सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या ठिकाणी माश्या, झुरळे, अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षण प्रमाणपत्र नसणे यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच अँटॉप हिल आणि टिळकनगर परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.






