Wednesday, November 25, 2026

दुष्काळग्रस्त ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा निर्णय

खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायद्याच्या प्रारूपालाही मंजुरी

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

राज्यात सध्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पाच कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य दिले जाते. तसेच आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये दिले जातात. मात्र, या दोन्ही योजनांचा लाभ मिळत नसलेल्या शेतकरी कुटुंबांनाही दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना दरमहा माणशी पाच किलो धान्य दिले जाणार आहे. यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. पुढील तीन महिन्यांसाठी हे धान्य वितरित करण्यात येणार असून, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत धान्याचा लाभ किंवा एपीएल-डीबीटी योजनेअंतर्गत रोख लाभ न मिळणाऱ्या ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस यंत्राद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्याचे वाटप करण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाल्यानंतरच बायोमेट्रिक पडताळणीद्वारे धान्य दिले जाणार आहे. या वितरणासाठी आवश्यक अतिरिक्त धान्याचे नियतन केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे मागण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

दरम्यान, राज्यातील खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’च्या प्रारूपाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. खासगी अनुदानित शाळांच्या प्रशासनापासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींपर्यंत विविध बाबींचे नियमन करण्यासाठी सर्वसमावेशक कायदेशीर चौकट निर्माण करण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात येत आहे.

राज्यातील एकूण शाळांपैकी खासगी अनुदानित शाळांचे प्रमाण २३ टक्के आहे. या शाळांमध्ये राज्यातील ४७ टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असून, ३७ टक्के शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांच्या नियमनासाठी सध्या लागू असलेल्या महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७, त्याअंतर्गतची १९८१ची नियमावली, माध्यमिक शाळा संहिता आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ यांमध्ये काही उणिवा आढळल्या आहेत. त्या दूर करून शाळांच्या कामकाजात अधिक प्रभावी नियमन आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

खासगी शाळांच्या विधेयकात काय?

या विधेयकात सुमारे २० प्रकरणांचा समावेश आहे. खासगी अनुदानित शाळांचे प्रशासन नियंत्रित करण्याचे शासनाचे अधिकार, शाळांची दर्जावाढ, अतिरिक्त तुकडीला मान्यता, शाळा समिती, अल्पसंख्याक खासगी अनुदानित शाळांसाठी विशेष तरतुदी, शाळांची जबाबदारी, शाळा, तुकडी किंवा माध्यम बंद करण्याची प्रक्रिया आणि परस्पर सहमतीने शाळांचे हस्तांतरण यांचा त्यात समावेश आहे. व्यवस्थापनातील वादामुळे प्रभावित झालेल्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी विशेष तरतुदी, शाळेच्या वेळेनंतर मैदान, इमारत आणि अन्य सुविधांचा वापर, समान स्वरूपाच्या प्रकरणांसाठी एकसमान कार्यपद्धती, शाळांना अनुदान आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही विधेयकात तरतुदी करण्यात आल्या आहेत.

याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती, शाळा न्यायाधिकरण, तक्रार निवारण समिती, दंडात्मक कारवाई, कसूरदार व्यवस्थापनाविरुद्धची कार्यवाही, लेखे व लेखापरीक्षण, अपील आणि पुनर्विलोकन यांसारख्या बाबींचाही समावेश आहे. खासगी अनुदानित शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे, सक्षम आणि जबाबदार प्रशासन निर्माण करणे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे संरक्षण करणे, ही या विधेयकाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पदभरतीसह खासगी अनुदानित शाळांच्या कामकाजात उत्तरदायित्व आणण्यावरही भर देण्यात आला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० यांमधील गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि उत्तरदायी शिक्षणव्यवस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशी कायदेशीर चौकट या विधेयकातून निर्माण होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >