Saturday, November 28, 2026

Rule Change 1st December: LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत...! 1 डिसेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम; थेट तुमचा खिशावर परिणाम

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे पाच महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. LPG सिलिंडरच्या किमतींपासून SBI क्रेडिट कार्ड शुल्कापर्यंत आणि टाटा मोटर्सच्या कारच्या किमतींपासून GST नियमांपर्यंत काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर.

नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. 1 डिसेंबर 2026 पासून एलपीजी सिलिंडरच्या किमती, एसबीआय क्रेडिट कार्डचे शुल्क, टाटा मोटर्सच्या कारच्या किमती, सेबीचे ट्रेडिंग नियम आणि जीएसटी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम घरगुती बजेटपासून ते वाहन खरेदी आणि व्यावसायिक व्यवहारांपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे नवीन महिन्यापासून नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

1. LPG सिलिंडरच्या किमतीत बदल होणार?

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार 1 डिसेंबर रोजीही घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर होण्याची शक्यता आहे.(New Rules)

विशेष म्हणजे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने बदल पाहायला मिळाले आहेत. दुसरीकडे, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर तुलनेने स्थिर राहिले आहेत.

1 डिसेंबरला होणाऱ्या दरबदलाकडे सर्वसामान्य ग्राहकांसह हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांचेही लक्ष लागले आहे. व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाल्यास हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढणार की कमी होणार, हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

2. SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना बसणार अतिरिक्त शुल्काचा फटका

डिसेंबर महिन्यापासून एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. एसबीआय कार्डने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार,1 डिसेंबर 2026 पासून काही विशिष्ट व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

या नियमानुसार, 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्सपोर्टेशन व्यवहारांवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल. तसेच एका बिलिंग सायकलमध्ये इंधनावर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास संबंधित व्यवहारांवर 1 टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे.(December 2026)

यामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या क्रेडिट कार्डधारकांनी या बदलाची माहिती घेणे आवश्यक आहे. विशेषतः प्रवास आणि इंधनासाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते.

3. टाटा मोटर्सच्या कार आणि SUV महागणार

नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही डिसेंबर महिना महत्त्वाचा ठरणार आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

1 डिसेंबर 2026 पासून कंपनीच्या पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींमध्ये वाढ लागू होणार आहे. वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार ही दरवाढ वेगळी असू शकते. उपलब्ध माहितीनुसार, वाहनांच्या किमतीत सुमारे 0.5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

या बदलाचा परिणाम टाटा मोटर्सच्या कार आणि एसयूव्ही खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे नवीन वाहन घेण्याचा विचार करणाऱ्यांनी नवीन किंमत यादीची माहिती घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Financial Rules)

4. SEBI चे कमोडिटी ट्रेडिंगसंदर्भातील नवे नियम

शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटशी संबंधित व्यवहार करणाऱ्यांसाठीही 1 डिसेंबरपासून महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. बाजार नियामक संस्था सेबीने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमधील ट्रेडिंगसाठी मार्जिन नियमांमध्ये बदल केले आहेत.

नव्या नियमानुसार कमोडिटीच्या किमतींमधील चढ-उतार आणि जोखमीच्या प्रमाणानुसार सुरुवातीचे मार्जिन निश्चित केले जाणार आहे. यासाठी तीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत.

  • कमी चढ-उतार असलेल्या कमोडिटीसाठी 6 टक्के मार्जिन.
  • मध्यम चढ-उतार असलेल्या कमोडिटीसाठी 8 टक्के मार्जिन.
  • अधिक चढ-उतार असलेल्या कमोडिटीसाठी 10 टक्के मार्जिन.

या बदलामुळे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये व्यवहार करणाऱ्या ट्रेडर्सना नव्या मार्जिन नियमांनुसार व्यवहार करावे लागतील. बाजारातील जोखीम लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत.

5. GST नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया होणार डिजिटल

जीएसटी करदात्यांसाठीही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात CBIC ने केंद्रीय जीएसटी नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित केली आहे.

या बदलानुसार जीएसटी नोंदणी रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या पात्र अर्जांची प्रक्रिया जीएसटी कॉमन पोर्टलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जाणार आहे. मात्र, ज्या अर्जदारांचे जीएसटी रिटर्न प्रलंबित आहेत किंवा कराची थकबाकी आहे, अशा प्रकरणांची संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल.(Money Matters)

या बदलामुळे जीएसटी नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेत डिजिटल पद्धतीचा वापर वाढणार असून, पात्र अर्जांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे.

सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार?

1 डिसेंबरपासून लागू होणारे हे पाच बदल वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम घरगुती आणि व्यावसायिक बजेटवर होऊ शकतो. एसबीआय क्रेडिट कार्डचे नवे शुल्क कार्डधारकांसाठी महत्त्वाचे आहे. तर टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किमती वाढल्याने नवीन कार खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

दुसरीकडे, सेबीचे नवे नियम कमोडिटी ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. जीएसटी नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेतील बदलाचा परिणाम व्यावसायिक आणि करदात्यांवर होईल.(Pocket Impact)

त्यामुळे डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वी या पाच बदलांची माहिती घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून तुमच्या खर्चाच्या नियोजनात कोणते बदल करावे लागतील, हे समजून घेण्यासाठी या नियमांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >