नवी मुंबई : अवघ्या ४० रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशी परिसरात घडली आहे. हत्येनंतर आरोपी रिक्षा घेऊन फरार झाले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही आरोपींचा माग काढत त्यांना मानखुर्दमधून अटक केली.
साहिल आनंद सुर्वे (२०) आणि साहिल यशवंत खरात (२०), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरातील रहिवासी आहेत.
ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ ...
१४० रुपयांच्या भाड्यावरून वाद
मृत रिक्षाचालकाचे नाव सुजनकुमार महातो असून ते घणसोली येथे राहत होते. २९ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कोपरखैराणे रेल्वे स्थानकाजवळ दोन्ही आरोपी महातो यांच्या रिक्षात बसले. त्यांनी मानखुर्दला जाण्यास सांगितले.
महातो यांनी प्रवासाचे भाडे १४० रुपये सांगितले. मात्र, आरोपींकडे केवळ १०० रुपये असल्याचे त्यांनी सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. सेक्टर ५ येथील हनुमान मंदिराजवळ हा वाद आणखी वाढला. आरोपींनी धारदार शस्त्र दाखवून महातो यांना धमकावले आणि रिक्षा पुढे चालवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
वाशीमध्ये धारदार शस्त्राने हल्ला
रिक्षा वाशीतील फोर्टिस रुग्णालयाजवळील मिनी सीशोर गार्डन परिसरात पोहोचल्यानंतर महातो यांना दुसऱ्या ग्राहकाचा फोन आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना रिक्षातून खाली उतरण्यास सांगितले. यानंतर पुन्हा वाद झाला.
यावेळी दोन्ही आरोपींनी महातो यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या मानेवर, डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने महातो यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी त्यांची रिक्षा घेऊन फरार झाले.
प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्हीमुळे आरोपी जाळ्यात
घटनेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण हल्ला पाहिला. मात्र, अंतर असल्याने त्याला आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसले नाहीत. त्याने पोलिसांना आरोपींच्या कपड्यांचे वर्णन दिले.
यानंतर गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळासह आरोपींनी वापरलेल्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर मानखुर्द परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, आरोपी साहिल सुर्वे याच्यावर यापूर्वी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






