Thursday, September 3, 2026

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात, महिनाभरापासून पाऊस गायब

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात, महिनाभरापासून पाऊस गायब

Ahilyanagar :हिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली आहे. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी पूर्ण केली, मात्र आता गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल पाच लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख १६ हजार २०९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ७ लाख १३ हजार ४१३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. मात्र, यंदा पावसाचे आगमनच जवळपास महिनाभर उशिराने झाले. त्यामुळे पेरण्यांनाही विलंब झाला. पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Ahilyanagar News)

पाऊस गायब, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

सुरुवातीला झालेल्या अल्प पावसाच्या आधारावर पिके कसाबसा तग धरून होती. मात्र, आता जवळपास महिनाभर पाऊसच नसल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. विशेषतः पिकांना वाढीसाठी आणि उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यावर पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि बाजरी या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा पावसाला झालेल्या विलंबाचा परिणाम मूग आणि उडदाच्या क्षेत्रावरही झाला. ज्या ठिकाणी पेरणी झाली, तिथेही अनेक भागांमध्ये मूग आणि उडदाच्या शेंगा व्यवस्थित भरलेल्या नाहीत. कापूस सध्या पाते आणि दोड्याच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाअभावी पानगळ आणि पातेगळ होण्याचे प्रमाण वाढत असून, दोड्या पोसण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. दुसरीकडे, सोयाबीन आणि बाजरी ही पिके फुलोऱ्यात असताना पावसाने पाठ फिरवली. सोयाबीनला शेंगा लागण्याचा आणि बाजरीचे दाणे भरण्याचा हा महत्त्वाचा काळ आहे. याच काळात पावसाची तूट निर्माण झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Ahilyanagar News)

कुठे दिलासा कुठे निराशा

जिल्ह्यातील काही भागांना मात्र धरणांमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे यांसह काही धरणे भरली आहेत. मुळा धरणातून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाऊस नसलेल्या भागांसाठी पाणी सोडण्यात आले असून, त्यातून गाव तलाव आणि पाझर तलाव भरण्यास मदत झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच भागांना धरणांच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जामखेड, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव आणि अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळी पट्टा सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी पावसाची ही मोठी तूट अधिक चिंतेची ठरत आहे.

पावसाने घेतलेली दीर्घ विश्रांती खरीप पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. पिके सध्या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके वाचवण्यासाठी आता पावसाची नितांत गरज असून, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >