Tuesday, September 29, 2026

चेन्नईचा मास्टरस्ट्रोक; आयपीएल फायनलमध्ये धोनीला बाद करणाऱ्या स्टारची CSK मध्ये एन्ट्री!

चेन्नईचा मास्टरस्ट्रोक; आयपीएल फायनलमध्ये धोनीला बाद करणाऱ्या स्टारची CSK मध्ये एन्ट्री!
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायीझी आपल्या उणीवा दूर करून संघ बांधणीसाठी पुढाकार घेत आहेत. त्या दृष्टीने सर्व संघाचे प्रयत्न सुरू आहेत. असं असताना चेन्नई सुपर किंग्सने डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मागच्या तीन पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या पदरात निराशा पडली होती. त्यामुळे यंदा जेतेपदाचा मानस ठेवून संघात बदल केले जात आहेत.मागच्या पर्वापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात बदल केले होते. आता मिनी लिलावात काही खेळाडूंचा भरणा करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी कोचिंग स्टाफमध्ये बदल पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्सने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान यांची नियुक्ती केली. आता नव्या गोलंदाज प्रशिक्षकांची संघात एन्ट्री झाली आहे. माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्माकडे जबाबदारी सोपवली आहे. एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळलेल्या मोहित शर्माकडे आयपीएल 2027 स्पर्धेसाठी जबाबदारी सोपवली आहे.चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांच्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिलं गेलं आहे. या वृत्तानुसार, फ्रेंचायझीने उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका सोपवली आहे. मुख्य प्रशिक्षक झहीर खान याने मोहितच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर त्याची संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये निवड केली आहे. मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्ससोबत पहिल्यांदाच येत असं नाही. खेळाडू असताना मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्ससाठी चार पर्वात खेळला होता.
मोहित शर्माने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी डेब्यू केलं होतं. त्यानंतर 2015 पर्यंत या संघासोबत होता. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा संघाचा भाग झाला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी 48 सामन्यात 58 विकेट घेतल्या आहेत. पण चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद मिळवलेल्या संघाचा भाग कधीच नव्हता. 2023 मध्ये सीएसकेच्या शेवटच्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रवासात मोहित शर्माच अडथळा ठरला होता. गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहितने अंतिम सामन्याच्या 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीला बाद केले होते. त्याने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूपर्यंत गुजरातला सामन्यात ठेवलं होते. पण जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजेतेपद मिळवून दिलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >