Saturday, October 3, 2026

BMC ची प्रत्येक वॉर्डातील किमान दहा वायू प्रदुषणाच्या हॉस्टस्पॉटवर करडी नजर

BMC ची प्रत्येक वॉर्डातील किमान दहा वायू प्रदुषणाच्या हॉस्टस्पॉटवर करडी नजर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी उपाययोजना तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा- 2026' तयार केला आहे. या कृती आराखड्यानुसार प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान 10 वायू प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांची अद्ययावत यादी आणि नकाशा तयार करण्यात येणार आहे. मोठी बांधकामे व पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा कामे, खुले कचरा जाळण्याची ठिकाणे, राडारोडा टाकण्याची ठिकाणे तसेच वाहतूक कोंडीची ठिकाणे यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक हॉटस्पॉटसाठी जबाबदार अधिकारी निश्चित करून नियमित देखरेख करण्यात येणार आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय विभागांच्या (वॉर्ड ऑफिस) सहायक आयुक्तांना ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा- 2026’ ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील वातावरण अधिकाधिक स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही राहावे यासाठी या संपूर्ण कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा प्रभाग स्तरावर नियमित आढावा घेण्यात येणार आहे. तसेच वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक व अंमलबजावणीची कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

बांधकाम स्थळांवरील प्रदूषणावर नियंत्रण

बांधकाम व पाडकामस्थळांवर विद्यमान 28 कलमी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम स्थळांवर कारणे दाखवा नोटीस, कामबंदीची नोटीस तसेच आवश्यकतेनुसार सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने दररोज किमान दोन बांधकामस्थळांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाडकामाच्या वेळी योग्य बॅरिकेडिंग, ताडपत्री अथवा हिरव्या कापडाने झाकणे आणि सातत्याने सूक्ष्म जलफवारणी करणे आवश्यक राहणार आहे.

रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पुन्हा विशेष स्वच्छता मोहीम

पावसाळ्यानंतर रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटविण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ‘पोस्ट-मॉन्सून डीप क्लीनिंग ड्राईव्ह’ राबविण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक व रस्त्यांच्या कडांची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर पुनर्वापराच्या पाण्याने रस्ते धुणे अथवा पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाणार आहे.

बांधकाम प्रकल्पांच्या आसपासचा परिसर स्वच्छ राखावा लागणार

बांधकामस्थळाच्या आकारानुसार संबंधित विकासक किंवा कंत्राटदाराने लगतचे रस्तेही स्वच्छ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 4000 चौरस मीटर पर्यंतच्या प्रकल्पासाठी 100 मीटर, 4000 ते 10,000 चौरस मीटर प्रकल्पासाठी 200 मीटर आणि 10,000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या प्रकल्पासाठी दोन्ही बाजूंना 500 मीटरपर्यंतचे रस्ते स्वच्छ ठेवावे लागणार आहेत.

राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी कडक नियम

बांधकाम व पाडकाम कचरा वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर येण्यापूर्वी त्यांच्या चाकांची स्वच्छता करणे आवश्यक राहणार आहे. राडारोडा वाहतुकीचे व विल्हेवाटीचे नियंत्रण मुंबई डेब्रीज कंट्रोल अँड ट्रॅकींग सिस्टीम (एमडीसीटीएस) द्वारे करण्यात येणार आहे. रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) वाहनांमधून रस्त्यावर काँक्रिट किंवा अन्य सामग्री सांडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

खुल्या जागेत कचरा जाळणे वाहनांचे प्रदूषण यावर कारवाई

मुंबईतील मोकळ्या जागी कचरा जाळण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रभाग स्तरावरील मार्शल्स आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा घटनांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच, प्रमुख वाहतूक मार्ग व वाहतूक कोंडीच्या ठिकाणी विशेष पीयूसी तपासणी मोहीम राबवून दृश्यमान धूर सोडणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) वाढल्यास अतिरिक्त उपाययोजना...

वायू गुणवत्ता निर्देशांकावर सातत्याने देखरेख ठेवून परिस्थितीनुसार ग्रॅप अंतर्गत उपाययोजना करण्यात येणार आहेत. वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक झाल्यास संबंधित परिसरात विशेष सखोल स्वच्छता, आवश्यक असेल तर रस्ते धुणे, पाण्याची फवारणी, मिस्टिंग तसेच खुल्या जागी कचरा जाळण्यावर कडक नियंत्रण यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. एखाद्या ठिकाणी हा निर्देशांक सलग तीन दिवस ३०० पेक्षा अधिक राहिल्यास, त्या स्थानकाच्या २ किलोमीटर परिसरातील प्रदूषणकारी कामे बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >