एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तान नमवत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं. या सामन्यात भारातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 211 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 212 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तान संघाची पुरती वाट लागली. तसेच 192 धावांपर्यंत मजल मारू शकले. भारताने हा सामना 19 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाकिस्तान संघाची पुन्हा एकदा नांगी ठेचली असून आणखी एक विजयी आघाडी घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ 18व्यांदा टी20 क्रिकेटमध्ये आमनेसामने आले होते. या विजयासह भारताने पाकिस्तानवर आघाडी मिळवण्याची ही 15वी वेळ आहे. तर पाकिस्तानचा संघ आतापर्यंत फक्त तीन वेळाच विजय मिळवू शकला आहे.
भारताचा डाव
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताकडून सलामीला वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने आक्रमक सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 28 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसन डाव पुढे नेण्यासाठी आला पण अवघ्या 2 धावा करून बाद झाला. पण अभिषेक शर्माने आपला झंझावात सुरूच ठेवला. त्याने 28 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 61 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर 21, इशान किशन 20 आणि शिवम दुबे 27 धावा करून बाद झाले. एका बाजूने तिलक वर्माने झुंजार खेली केली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाला 211 धावांपर्यत मजल मारता आली. तिलक वर्माने 22 चेंडूत 4 षटाकर आणि 3 चौकाराच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या.
एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असताना भारतीय स्पर्धकांनी मोठी झेप घेतली आहे. धडाधड गोल्ड मेडल मिळवून पदकतालिकेतील गुणांकन सुधारलं आहे. ...
पाकिस्तानचा डाव
भारताने विजयासठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान सावध सुरूवात केली. कर्णधार साहिबजादा फरहान आणि माज सदाकत यांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावा केल्या. पण फरहान 10 धावा करून बाद झाला आणि पाकिस्तानच्या धडाधड विकेट पडल्या. उस्मान खान फक्त 3 धावा करून बाद झाला. तर माज सदाकतही 23 धावा करून तंबूत परतला. चौथ्या विकेटसाठी हसन नवाज आणि सैम नवाज यांनी डाव सावरला. या दोघांनी 48 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. पण सैम अयुब 29 धावा करून बाद झाला आणि सामना पुन्हा एकदा भारताच्या पारड्यात झुकला. हसन नवाजला दोन जीवदान मिळाल्याने त्याने त्याला फायदा घेतला. त्याने 51 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकार मारत 96 धावांची खेळी केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. भारताकडून अक्षर पटेलने 2, वॉशिंग्टन सुंदरने 2 आणि शिवम दुबेने 2 विकेट काढल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान (कर्णधार ), माज सदाकत, उस्मान खान (विकेटकीपर), सैम अयुब, हसन नवाज, अब्दुल समद, अराफत मिन्हास, अहमद दानियाल, साद मसूद, अबरार अहमद, सुफयान मोकीम.
भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह.





