Sunday, October 4, 2026

Mumbai Local: रेल्वेचे 'हे' नियम मोडल्यास भरावा लागणार इतका दंड, वाचा नियमावली...

Mumbai Local: रेल्वेचे 'हे' नियम मोडल्यास भरावा लागणार इतका दंड, वाचा नियमावली...

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. विनातिकिट, बनावट तिकिट, दुसऱ्यांचा पास वापरून प्रवास करणाऱ्यांवर आता रेल्वेकडून कारवाई केली जाणार आहे. अनेक वेगवेगळे गुन्हे किंवा अनधिकृत कृत्ये केल्यावर सुद्धा रेल्वेकडून प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये रेल्वेकडून तिकिट तपासणाऱ्याला पास किंवा तिकिटासोबत आपलं ओळखपत्र दाखवणं सुद्धा अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता प्रवाशांनी कोणकोणते गुन्हे केल्यावर किती दंड भरावा लागणार ? याची माहितीच थेट मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांना दिली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर गुन्हे आणि त्यांना भरावा लागणारा दंड याची यादीच जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या अधिकृत एक्स हँडलवर ही माहिती शेअर केलेली आहे. बनावट तिकिटाने प्रवास करणाऱ्यांवर कलम 137 अन्वये, प्रवाशाकडून भाडे आणि अतिरिक्त शुल्क (किमान 500रू.) दंड म्हणून आकारला जाणार आहे. विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कलम 138 अन्वये, अतिरिक्त शुल्क (किमान 500रू.) दंड म्हणून प्रवाशाकडून आकारला जाणार आहे. दुसऱ्यांच्या पासवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कलम 142 अन्वये, प्रवाशाकडून भाडे आणि अतिरिक्त शुल्क (किमान 500रू.) दंड म्हणून आकारला जाणार आहे.

इतरत्र कोणकोणत्या गुन्ह्यावरून प्रवाशांना शिक्षा होऊ शकते?

  • परवाना शिवाय फेरीवाला, विक्री करणे किंवा भिक मागणाऱ्याला कलम 144 अन्वये ₹ 2000/-चा दंड
  • गोंधळ घालणे, मद्यपान करून बडबड करणे किंवा अश्लील भाषा वापरणाऱ्या प्रवाशावर कलम 145 अन्वये ₹ 1000/-चा दंड
  • रेल्वे कर्मचाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यावर कलम 146 अन्वये ₹ 2500/-चा दंड
  • प्रवेश बंदी असणाऱ्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यावर कलम 147 अन्वये ₹ 500/-चा दंड
  • आरक्षित डब्यातून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशावर कलम 155(1) अन्वये ₹ 2000/-चा दंड
  • आरक्षित डब्ब्यातील सीट रिकामा न करणाऱ्या प्रवाशावर कलम 155(2) अन्वये ₹ 1000/-चा दंड
  • रेल्वेच्या सुचनांचे नियम न करणाऱ्या प्रवाशावर कलम 159 अन्वये ₹ 500/-चा दंड
  • महिलांच्या राखीव डब्यात किंवा परिसरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशावर कलम 162 अन्वये ₹ 2,500/-चा दंड आणि हकालपट्टी
  • घोषित न केलेल्या किंवा चुकीची माहिती देऊन मालाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशावर कलम 163 अन्वये सरकारने अधिसूचित केलेला दंड भरावा लागणार आहे.
  • धोकादायक किंवा प्रतिबंधित वस्तू बाळगणाऱ्या प्रवाशावर कलम 165 अन्वये किमान ₹ 10,000/-चा दंड
  • रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, सूचना फलक विद्रूप करणाऱ्या व्यक्तीवर कलम 166 अन्वये ₹ 2000/-चा दंड असेल. वारंवार जर या व्यक्तीकडून तोच गुन्हा घडत असेल तर त्याच्या दंडाची रक्कम वाढत जाणार आहे.
  • रेल्वेमध्ये धुम्रपान करणाऱ्या प्रवाशावर कलम 167 अन्वये ₹ 2000/-चा दंड आणि हकालपट्टी

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे जर प्रवाशांकडून कोणता गुन्हा झाल्यास पोलिसांकडून किंवा तिकिट तपासणीकडून तात्काळ कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, दिव्यांगजनांच्या राखीव डब्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम शनिवारी (3 ऑक्टोबर 2026) राबवण्यात आली. मोहिमेत, अनियमित प्रवास किंवा विना तिकिट प्रवास करणाऱ्या 39 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. ₹78,000/- दंड म्हणून वसूल करण्यात आले. आपल्या तिकिटाप्रमाणेच त्याच डब्ब्यातून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने प्रवाशांना केले आहे. अवैध तिकिटावर किंवा अनधिकृत डब्यातून प्रवास करणे हा अनियमित प्रवास मानला जाईल. आपल्यासोबत वैध तिकीट ठेवा आणि केवळ आपल्यासाठी राखीव असलेल्या डब्याचाच वापर करा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा