- १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग झाल्यास कारवाई; अमराठी चालकांना परिवहनमंत्री सरनाईकांचा इशारा
मुंबई : व्यवहारिक मराठीच्या कायद्याच्या अंमलबजावणीला मिळालेली स्थगिती ही कायदा टाळण्याची संधी नव्हे, तर मराठी शिकण्यासाठी मिळालेली मुदत आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांनी या कालावधीत मराठी शिकून घ्यावी. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यावर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिला.
छत्रपती संभाजीनगर : पैठण शहरात एसटी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 5 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात शहरातील एका कापड ...
महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषा शिकणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी होण्याचे आवाहन केले. परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० हून अधिक ठिकाणी शाखा सुरू करून सुमारे १ हजार ८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक चालकांना व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, राज्यात अद्याप सुमारे आठ ते नऊ लाख अमराठी चालक कार्यरत असल्याने उर्वरित चालकांसाठी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. प्रशिक्षण वर्गात नोंदणी करण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीनेही मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध आहे.
काही रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र, स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या मुदतीचा उपयोग प्रशिक्षणासाठी करावा आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळेल, असे गृहीत धरू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.






