Friday, October 9, 2026

जलप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल, पश्चिम उपनगरांत 5.8 किमी बोगद्याचे काम यशस्वी

समुद्र व नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मलजलाची गुणवत्ता सुधारून जल प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने बीएमसीच्या महत्त्वाकांक्षी प्राधान्य मलजल बोगदा टप्पा - 1 प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आज यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

समुद्र व नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मलजलाची गुणवत्ता सुधारून जल प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्राधान्य मलजल बोगदा टप्पा - 1 प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आज, दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाला. बोरिवलीतील डॉन बॉस्को स्कूल जंक्शन ते नवीन मालाड उदंचन केंद्र, मालवणी- मालाड या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 5.8 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलजल बोगद्याचे अंतिम ‘ब्रेक - थ्रू’ डॉन बॉस्को स्कूल जंक्शन येथे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून, संपूर्ण प्रकल्प येत्या 31 जुलै 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरांतील मलनिःसारण यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहेत. मलजलावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने निचरा करणे, जलप्रदूषण कमी करणे आणि मुंबईकरांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करणे, हा या कामांचा प्रमुख उद्देश आहे. याच व्यापक उद्दिष्टाचा भाग म्हणून प्राधान्य मलजल बोगदा टप्पा - 1 हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये व तांत्रिक बाबी

प्राधान्य मलजल बोगदा टप्पा - 1 चे काम 'सेगमेंटल लायनिंग' या तंत्रज्ञानाने करण्यात आले आहे. बोगद्याचे संरेखन बोरिवलीच्‍या डॉन बॉस्को स्कूल जंक्शनपासून नवीन मालाड उदंचन केंद्र, मालवणी- मालाडपर्यंत आहे. बोगद्याचे खोदकाम व बांधकाम विरुद्ध दिशेने म्हणजेच नवीन मालाड उदंचन केंद्र, मालवणी- मालाडपासून ते डॉन बॉस्को स्कूल जंक्शन, बोरिवली असे करण्यात आले आहे. डॉन बॉस्को स्कूल जंक्शन, बोरिवली येथे बोगद्याचा अंतिम ‘ब्रेक थ्रू’ यशस्वी झाला आहे. या मलजल बोगद्याची एकूण लांबी 5.8 किलोमीटर इतकी आहे. मलजल बोगद्याचा अंतर्गत व्यास 3.2 मीटर आहे. बोगद्याची मलजल वाहून नेण्याची क्षमता 1 हजार 182 दशलक्ष लीटर प्रतिदिन आहे. एकूण शाफ्ट्सची संख्या 5 असून एकूण ड्रॉप शाफ्ट्सची संख्या 3 आहे. एकूण स्क्रीन चेंबर्सची संख्या 6 आहे.

प्रकल्पाचे प्रमुख फायदे

पश्चिम उपनगरातील विशेषतः आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर व अंशतः पी उत्तर या विभागांमधील दहिसर, बोरिवली, गोराई, चारकोप, मालाड व कांदिवली या परिसरातील सध्या अस्तित्वात असलेले मलजल वाहिन्यांचे जाळे हे सद्यस्थितीतील मलजल वाहून नेण्यास सक्षम नाही. त्यामुळे या परिसरातील मलनिःसारण वाहिन्या कायम अधिभारित स्थितीत असतात. प्राधान्य मलजल बोगदा टप्पा 1 च्या कामामुळे पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोराई, शिंपोली व चारकोप या परिसरातील मलजल वहनाची क्षमता 1 हजार 136 दशलक्ष लीटर प्रतिदिनपर्यंत वाढण्यास मदत होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या मलनिःसारण वाहिनीवरील अतिरिक्त ताण त्यामुळे कमी होईल व मलजल वाहिन्यांची अधिभारित स्थिती उद्भवणार नाही. प्राधान्य मलजल बोगदा टप्पा - 1 मध्ये गोराई, शिंपोली, चारकोप व मालाड या चार उदंचन केंद्रांकडे येणारे मलजल समाविष्ट करण्यात येईल व त्यामुळे या चारही उदंचन केंद्रांची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे उदंचन केंद्रांवर होणाऱ्या परिरक्षण व दुरुस्तीच्या खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >