Tuesday, November 24, 2026

Nashik Crime : आजार बरा करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष अन्..., भोंदूबाबा अरुण पाटीलला अटक

Nashik Crime : घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अस्थम्याचा आजार बरा करण्याचे आश्वासन देत जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी पूजा करून त्याने महिलेची आर्थिक फसवणूक केली होती. अरुण धोंडू पाटील (वय ४८, रा. ध्रुवनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संशयित अरुण पाटील याने फिर्यादी महिलेला अस्थम्याचा आजार बरा करण्याचे तसेच घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी पूजा आणि विविध विधी केल्याचा बनाव केला. या माध्यमातून त्याने महिलेकडून तब्बल सात लाख ५० हजार रुपये उकळले.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ आणि ३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होता.

भोंदूबाबा अरुण पाटीलला अटक

दरम्यान, संशयित अरुण पाटील हा म्हसरूळ वस्ती परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा, आंबड युनिट-३ च्या पोलीस पथकाला मिळाली. पोलीस अंमलदार गौरव धात्रक, महेंद्र दोंदे आणि राजेश महाले यांनी ही माहिती दिल्यानंतर प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास शेत परिसरातून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >