- ‘एमएमआरडीए’चे निर्देश; ‘लँड जिहाद’ झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ जवळ उभारण्यात आलेली मशीद अनधिकृत स्पष्ट करीत ती हटविण्याचे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिले आहेत. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे एमएमआरडीएने विमानतळ प्रशासनाला कळविल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलीस चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विमानतळाच्या व्हीआयपी गेटजवळ ही मशीद उभारण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला. या ठिकाणी १२ वातानुकूलित यंत्रे आणि ३० पाण्याचे नळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या बांधकामाविरोधात आपण आवाज उठवल्यानंतर महायुती सरकारच्या माध्यमातून एमएमआरडीएने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला याबाबत इशारा दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला. एमएमआरडीएने संबंधित बांधकामासाठी कोणतीही मंजुरी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले असून, ते अनधिकृत असल्याने ते तातडीने हटविण्याचे निर्देश विमानतळ कंपनीला देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यासंदर्भातील पत्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले आहे.
Simhastha Mahakumbh Mela 2027 : ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) नाव नोंदवू इच्छिणाऱ्या मंडळांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ‘सिंहस्थ महाकुंभ ...
या प्रकरणावरून सोमय्या यांनी ‘लँड जिहाद’चा आरोपही केला आहे. संवेदनशील ठिकाणी मशीद, कब्र किंवा दर्ग्याच्या नावाखाली अशा प्रकारे जमिनीवर अतिक्रमण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी करण्याची मागणी आपण केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. यापूर्वी वांद्रे रेल्वे टर्मिनसजवळ बांगलादेशी मुस्लिम येऊन स्थायिक झाल्याचा दावा करत त्यांनी आता विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणाजवळ अशा प्रकारचे बांधकाम झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
या प्रकरणामागे असलेल्या विश्वस्तांसह संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी मुंबई विमानतळ आणि एमएमआरडीएकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मतांसाठी विरोधक देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यास तयार असल्याचा आरोप त्यांनी केला.






