फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शुक्रवारी (18 सप्टेंबर) एका शाळेत झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. दक्षिण कोटाबाटो प्रांतातील बंगा नॅशनल हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाल्याची ताजी माहिती फिलीपिन्सच्या सामाजिक कल्याण आणि विकास विभागाने (DSWD) दिली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारच्या घटनेने परिसरात खळबळ
घटनेनंतर बंगा परिसरातील सर्व स्तरांवरील शाळांमधील वर्ग तातडीने स्थगित करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. जखमी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
फिलीपिन्सच्या शिक्षण विभागाने या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता असल्याचे विभागाने म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांत राहावे आणि घटनेशी संबंधित अप्रमाणित माहिती किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभावित विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि सामाजिक मदत देण्याची तयारीही शिक्षण विभागाने दर्शवली आहे.
फिलीपिन्समध्ये गेल्या काही महिन्यांत शाळांमध्ये गोळीबाराच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बंगा येथील घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.






