देशातील साहित्य क्षेत्रातील सन्मानाचे साहित्य अकादमीचे पुरस्कार मराठीत अरुण खोपकर, श्रीकांत बहुलकर यांना जाहीर झाले आहेत.
नवी दिल्ली- देशातील साहित्य क्षेत्रातील सन्मानाचे साहित्य अकादमीचे पुरस्कार मराठीत अरुण खोपकर, श्रीकांत बहुलकर यांना जाहीर झाले आहेत. तर कोकणी भाषेत साहित्यिक उदय भेम्ब्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, समीक्षा, नाटक आदींसाठी २०१५ चे साहित्य अकादमीचे पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव म्हणाले की, २३ भाषांमधील नामवंत परीक्षकांनी शिफारस केल्यानंतर त्याला अकादमीच्या कार्यकारी मंडळाने मंजुरी दिली.
मानचिन्ह, शाल, एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
मराठीत ‘चलत-चित्रव्यूह’ या पुस्तकासाठी अरुण खोपकर यांना तर अत्यंत प्रतिष्ठेचा भाषासन्मान पुरस्कार लेखक व विद्वान श्रीकांत बहुलकर यांना मध्ययुगीन व भाषांचा शास्त्रीय अभ्यास केल्याप्रकरणी जाहीर झाला. तर कोकणी साहित्यिक उदय भेम्ब्रे यांना ‘कर्णपर्व’ या पुस्तकासाठी हा सन्मान जाहीर झाला.
कवितांसाठी ब्रजेंद्रकुमार ब्रह्मा (बोडो), धियान सिंग (डोगरी), रामदर्श मिश्रा (हिंदी), के. व्ही. तिरूमलेश (कन्नड), श्रेती राजन (मणीपुरी), रामशंकर अवस्थी (संस्कृत) यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.
लघुकथांसाठी कुला सैकिया (आसामी), मनमोहन झा (मैथीली), गुप्ता प्रधान (नेपाळी), बिभुती पटनायक (ओडिया), माया राही (सिंधी), वोल्गा (तेलूग) यांना मिळाला.
पंजाबी कादंबरीसाठी ‘मात लोकल’साठी जसविंदर सिंग यांना तर राजस्थानी कादंबरी ‘गवाद’साठी मधू आचार्य यांना पुरस्कार मिळाला.
निबंधासाठी रसिक शहा (गुजराती), ए. माधवन (तामिळ) तर नाटकासाठी उदय भेम्ब्रे (कोकणी), राबीलाल तुडू (संथाली), समीक्षेसाठी बशीर भादरवाही (काश्मिरी), शमीम तारीक (उर्दू) यांना पुरस्कार जाहीर झाले.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन .
यांचे ई – मेल मिळतील का ?