जेलीफिशच्या काट्यांवर उपाय काय.? तर गरम पाण्याची आंघोळ! जेलीफिशच्या काट्यांमुळे त्वचेवर हजारो सुया टोचल्यासारख्या वेदना होतात.
जेलीफिशच्या काट्यांवर उपाय काय.? तर गरम पाण्याची आंघोळ! जेलीफिशच्या काट्यांमुळे त्वचेवर हजारो सुया टोचल्यासारख्या वेदना होतात. शिवाय त्वचेवर लालसर फोड येऊन खाज येणारा पुरळ उठतो. हा त्रास काही आठवडे सहन करावा लागतो. त्यामुळे समुद्रात पोहायला जाणा-या व्यक्ती नेहमी जेलीफिशपासून चार हात दूर राहतात. आपल्याकडे गणपती विसर्जनादरम्यान जुहू किंवा गिरगाव चौपाटीवर अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल.
जेलीफिश स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याच्या अंगातील नेमॅटोसाइस्ट नावाचा एक काटेरी भाग शत्रूला टोचतो. त्याला कोणताही परकीय स्पर्श झाल्यावर त्याच्याकडून ही प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया घडते. हाच प्रकार जेलीफिश व माणसाच्या बाबतीतही होतो. कधी कधी हे काटे विषारीही असतात. या वेदनांवर व्हिनेगर ओतल्यामुळे काट्यांचा परिणाम ओसरतो, असं म्हणतात. जेलीफिशपासून होणा-या या त्रासातून सुटका होण्यासाठी अद्याप कोणालाही अगदी खात्रीलायक उपाय सापडलेला नाही. पण यावर संशोधन सुरू आहे. अशाच एका संशोधनात जेलीफिशचे काटे टोचल्यावर तो भाग म्हणजे पाय किंवा हात वगैरे गरम पाण्यात बुडवून ठेवणं हे अतिशय आरामदायी असल्याचं आढळून आलं आहे. ऑस्ट्रेलियातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या सहायक प्राध्यापक अँजेला वेबस्टर यांनी हे संशोधन केलं आहे.
जेलीफिशच्या काट्यांमुळे उद्भवणा-या वेदनांवर त्यांना हा उत्तम उपाय सापडला आहे व तो इतर उपायांपेक्षा अक्सिर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जगभरात जेलीफिशच्या काट्यांचे लाखो लोक शिकार होतात. नुसत्या ऑस्ट्रेलियातच एका वर्षात किमान चाळीस हजार लोकांना या वेदना सहन कराव्या लागल्याची माहिती सर्फ लाइफ सेव्हिंग ऑस्ट्रेलियानं दिली आहे. वेबस्टर यांचा अभ्यास अहवाल कॉक्रेन लायब्ररीत प्रसिद्ध झाला आहे. अँजेला वेबस्टर यांच्या संशोधनानुसार वेदनाग्रस्त भाग गरम पाण्यात बुडवल्यावर वेदना कमी होतात व इतर उपायांपेक्षा हा उपाय पन्नास टक्के अधिक फायदेशीर आहे. समुद्रकिना-यावरील लाइफगार्डस्ना जेलीफिशपासून त्रास झालेल्या लोकांवर उपाय करण्यासाठी या संशोधनाचा मोठा उपयोग होऊ शकतो.
कोकण किरा-यावरील मच्छिमार हा उपाय पिठ्यान पिठ्या वापरत आहेत. त्याचप्रमाणे यावर आणखीन एक गावठी उपाय म्हणजे तंबाखु पाण्यात घालुन ते पाणी लावल्यास वेदना कमी होतात. गावठी तुपाचाही चांगला उपयोग होतो.