राज्यातील १५ लाख मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या बँक खात्यात डिसेंबपर्यंत ‘सावित्रीबाई फुले ऑनलाइन शिष्यवृत्ती’द्वारे रक्कम जमा होणार आहे.
ठाणे – राज्यातील १५ लाख मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या बँक खात्यात डिसेंबपर्यंत ‘सावित्रीबाई फुले ऑनलाइन शिष्यवृत्ती’द्वारे रक्कम जमा होणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार विद्यार्थिनींना लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ठाण्यात दिले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून राज्यातील पाचवी ते दहावीतील मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी ठाणे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी ठाणे जिल्हा परिषदेतील ताराबाई मोडक सभागृहात मोघे यांच्या हस्ते झाले. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सारिका गायकवाड, उपाध्यक्ष इरफान भुरे, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यात २०११-१२ ला एक लाख, २०१२-१३ ला १२ लाख मागासवर्गीय विद्यार्थिनींना लाभ मिळाला आहे. २०१३-१४ ला या ऑनलाइन योजनेतून १५ लाख विद्यार्थिनींच्या खात्यात डिसेंबपर्यंत रक्कम जमा होईल, असा आशावादही मोघे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने यापूर्वी ई-स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या अंतर्गत विविध योजनांतून आतापर्यंत १८ कोटी रुपये वितरित करण्याचा विक्रम एकटय़ा राज्याने केला आहे. राज्याकडून सप्टेंबरमध्येच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे पैसे देण्यात येतात, मात्र हे पैसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला अनेक महिने लागतात. शाळांत शिक्षकांकडून या योजनेचे फॉर्म वेळेवर भरून मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थिनींना वेळेवर पैसे उपलब्ध होत नव्हते. काही विद्यार्थिनींना तीन ते चार वेळा शिष्यवृत्ती मिळाल्याची घटना वर्धा येथे घडली आहे. यासाठीच या शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी ही ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली. या वर्षीपासून या योजनेची वर्षाभराची रक्कम विद्यार्थिनीच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यात डिसेंबपर्यंत जमा होईल, असेही त्यांनी सांगितले. पुरवणी अर्थसंकल्पातून १६०० कोटी सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले. त्यातील १७६ कोटी शहरी दलित विकासासाठी, तर ३०० कोटी ग्रामीण भागातील दलित विकासासाठी देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बँकांना शून्य रकमेवर खाते उघडण्यास विनंती करणार
सरकारी योजनेतून येणारे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, असे सरकारचे धोरण आहे. पण अनेक बँका शून्य रकमेवर खाते उघडण्यास नाखूश असतात. त्या-त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतात. त्यांच्यामार्फत या बँकांना असे खाते उघडण्यास प्रवृत्त करण्यात येईल, असे संजय सावकारे यांनी सांगितले. सरकारी व सैनिकी शाळांत शिकणा-या एक लाख विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता ऑनलाइन देण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक अधिवेशनाच्या दोन दिवसांत मांडू
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाबाबत मुख्यमंत्र्यांची वारक-यांशी बैठक होणे आवश्यक आहे. ती बैठक झाल्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत हे विधेयक मांडू. पण आता त्यात कोणताही बदल वा सुधारणा होणार नाही, असेही मोघे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. पैसे वाढवण्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
AT