मार्च २०१४मध्ये होणा-या दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात येणा-या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. यासंदर्भातील सविस्तर माहिती शिक्षण मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या वेळीही प्रत्येक विषयाच्या पेपरमध्ये किमान एक दिवसाचा कालावधी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तयारी करण्यास बराचसा वेळ मिळणार आहे.
तीन मार्च ते २७ मार्च २०१४ या दरम्यान दहावीची लेखी परीक्षा होईल. त्यात मुख्य विषयांची परीक्षा ३ ते २४ मार्च दरम्यान घेतली जाईल. मुख्य विषयांच्या पेपरमध्ये किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला आहे. बारावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते २९ मार्च २०१४ दरम्यान घेण्यात येईल.
राज्यात गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात आणि इतर नियोजनामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या बदलाचा एक भाग म्हणून प्रत्येक वर्षी १ जुलैला दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणा-या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. परीक्षेला सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना अभ्यासक्रमांचे योग्य नियोजन करता येईल, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
exam