Sunday, October 4, 2026

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. भोकरपाडा आणि मोरबे मुख्य जलवाहिनीवर महत्त्वाचे काम हाती घेतल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी तब्बल 16 तासांसाठी नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याचा फटका नवी मुंबई आणि पनवेल परिसरामधील रहिवाशांना बसणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ते बुधवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार आहेत. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील 13.5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पंपाच्या चॅनेल व्हॉल्व्हसाठी एम.एस. प्लेट बसविण्याचे काम केले जाणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन मीटरिंग किऑस्क बसविण्याचे काम केले जाणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळील 2000 मि.मी. व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याचे काम केले जाणार आहे.

शिवाय, बेलापूर सी.बी.डी. सेक्टर-9 मध्ये मोरबे मुख्य जलवाहिनीवर 1200 मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. वाशी येथील अरेंजा सर्कलजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 900 मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्याचे काम केले जाणार आहे. महापे येथे मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 800 मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर रोजी 16 तासांसाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बंदचा फटका बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे- सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागांवर होणार आहे. शिवाय, सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. दरम्यान, बुधवारी 7 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा पूर्ववत केल्यानंतर जलवाहिनीतील प्रवाह सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी सकाळचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणीपुरवठा बंदच्या कालावधीचा विचार करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >