अंटार्क्टिका सर करण्याचा अनुभव हा आयुष्यातील अनेक महत्त्वाकांक्षी अनुभवांपैकी एक अनुभव होता.
मुंबई- अंटार्क्टिका सर करण्याचा अनुभव हा आयुष्यातील अनेक महत्त्वाकांक्षी अनुभवांपैकी एक अनुभव होता. अंटार्क्टिका प्रवास करताना क्षमतेचा कस लागतो.
अंटार्क्टिका सर करून त्या ठिकाणी भारती रिसर्च सेंटर उभारण्यासाठी जो संघ पाठविण्यात आला होता त्यात मी एकमेव महिला होते.
आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवू शकते. ही जिद्द मनाशी बाळगत मी हा प्रवास यशस्वीरित्या करू शकले, असे मत अंटार्क्टिका मोहीम फत्ते केलेल्या डॉ. ममता लाला यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त ‘वाकोला महिला मंडळा’तर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
वाकोला हितवर्धक संघाच्या ‘वाकोला महिला मंडळा’तर्फे सांताक्रूझ पूर्व येथील पेजावर मठ सभागृहात महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १५ वर्षापासून या मंडळातर्फे सामाजिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
महिला दिनाचे औचित्य साधत या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्ट मोहीम सर केलेल्या डॉ. मुराद लाला आणि अंटार्क्टिका मोहीम सर केलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. ममता लाला यांना बोलाविले होते.
या कार्यक्रमाला वाकोला वेल्फेअर सेंटरच्या अध्यक्ष डॉ. शांता शेटय़े, वाकोला महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा जोशी, मंडळाच्या उपाध्यक्ष कुंदा देशपांडे, सचिव अमिता मेस्त्री, उपसचिव वर्षा सोमण, खजिनदार शीतल सावंत, सभासद मंगला भावे, सल्लागार मालती वझे यांच्यासह महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.
डॉ. मुराद आणि डॉ. ममता यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉ. मुराद यांनी केलेल्या एव्हरेस्ट प्रवासावर आणि डॉ. ममता यांच्या अंटार्क्टिका प्रवासावर बनविण्यात आलेले लघुपट या वेळी दाखविण्यात आले. हा प्रवास करताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले याचे कथन दोघांनी या वेळी केले.
बालरोगतज्ज्ञ असणा-या डॉ. ममता यांना लहानपणापासून बर्फाळ प्रदेशाचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे बर्फाळ प्रदेशाविषयी अभ्यास करत सुरू झालेला प्रवास नंतर थेट अंटार्क्टिकापर्यंत पोहोचला. अंटार्क्टिकामध्ये भारती रिसर्च सेंटर उभारण्यासाठी २०११मध्ये २७ जणांचा संघ पाठविण्यात आला होता.
या संघामध्ये डॉ. ममता या एकमेव महिला होत्या. हा सहा महिन्यांचा प्रवास डॉ. ममता यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. कोणतीही मोहीम सर करताना वय, लिंग असे कोणतेही मुद्दे अडसर ठरू शकत नाहीत तसेच स्पर्धा जिंकणे किंवा नवनवे विक्रम करणे हे ध्येय ठरविण्यापेक्षा आनंद मिळविण्यासाठी महिलांनी यात सहभाग घ्यावा, असे डॉ. ममता यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात कार्यरत असणा-या डॉ. मुराद लाला यांनी वयाच्या ५०व्या वर्षी एव्हरेस्ट सर केले होते. ‘पीक फ्रिक्स’ या कॅनेडियन ग्रुपच्या सहकार्याने त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेची तयारी केली होती. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी भारतीय असल्याचा अभिमान मनाशी कायम बाळगला असल्याचे डॉ. मुराद आणि डॉ. ममता यांनी या वेळी आवर्जून सांगितले.