भिवंडी शहरातील इदगाह रोडवरील अमानिशाह तकिया कब्रस्तानात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दोघांचा नरबळी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
भिवंडी- शहरातील इदगाह रोडवरील अमानिशाह तकिया कब्रस्तानात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दोघांचा नरबळी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या नरबळींच्या मृतदेहांजवळ जादूटोण्यासाठी वापरण्यात आलेले लिंबू, टाचण्या, लोखंडी खिळे, काळी बाहुली सापडली असून पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. मिनरुल ईलाही शेख (४५ रा. महाराष्ट्र नगर, मानखुर्द) व एक ३० वर्षीय अनोळखी तरुण या दोघांचे नरबळी दिल्याची माहिती आहे.
इदगाह रोड परिसरातील अमानिशाह तकिया कब्रस्तान येथे रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एक स्थानिक रहिवासी मासे पकडण्याच्या गळासाठी गांडूळ (पार) शोधण्याठी गेला होता. त्यावेळी त्याला कब्रस्तानाजवळ मृतदेह आढळला. या मुळे हा रहिवासी घाबरून पळून जात असताना त्याला मृतदेहापासून १०० फूट अंतरावर आणखी एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक परवेज मोमीन यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती भोईवाडा पोलिस ठाण्याला दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव शिंदे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. वाढवे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यातील अंदाजे ३० वर्षे वयाच्या व्यक्तीची शारिरीक हालचाल झाल्याचे आढळले. या जखमीला तातडीने स्व. इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दोन्ही मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालात शस्त्राने हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तथा भिवंडी प्रभारी पोलीस उपायुक्त पराग मणेरा, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात हत्या व अंधश्रद्धा, नरबळी, जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या दोन मृतांपैकी ओळख पटलेला मिनरुल हा भिवंडीत कुठून आला व त्याच्या सोबत आढळलेला ३० वर्षीय मृत व्यक्ती कोण आहे. याची माहिती पोलीस घेत आहेत. यातील मिनरूलच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा चौकशी सुरू केली.