भाईंदर – अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे सभापतींनी आदेश देऊनही प्रभाग अधिका-यांनी केलेल्या ‘सेटिंग’मुळे ती टाळली जात होती. त्यामुळे सभापतींनी स्वत: बुलडोझर आणि प्रभाग अधिका-यांच्या अतिक्रमणविरोधी पथकासह सदर ठिकाणी जाऊन कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे अधिका-यांच्या ‘सेटिंग’वर सभापतींचा बुलडोझर फिरल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
महापालिका अधिकारी काम करत नाहीत, तसेच सभापतींचा आदेश मनात नसल्यामुळे महापौर, उपमहापौरांसह सर्व सभापतींनी आपल्या दालनाला टाळे मारून निषेध व्यक्त केला होता. आजही तशीच परिस्थिती आहे.
कोणताही प्रभाग अधिकारी प्रभाग समिती सभापतींचे आदेश मानत नाहीत. प्रभाग क्र. ४ मधील इंद्रालोक परिसरातील ओम शांती चौकाजवळ रस्त्यावर अनधिकृतपणे पाच गाळे बांधण्याचे काम सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्रभाग कार्यालय तसेच सभापतींना सुद्धा आल्या होत्या. त्यावर सभापतींनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र २० दिवस झाले तरी कारवाई न केल्यामुळे अखेर सभापतींनी अधिका-याला बोलावून घेऊन बुलडोझर, अतिक्रमण विरोधी पथकासह सदर बांधकामावर बुलडोझर फिरवून अतिक्रमण जमीनदोस्त केले.
पक्षाच्या धोरणानुसार कोणत्याही अनधिकृत कामांना पाठीशी घालणार नाही. या धडक कारवाईमुळे सर्व प्रभाग अधिका-यांचे डोळे उघडतील.
– अरविंद शेट्टी, सभापती
तीन-चार महिन्यांपूर्वी सदर बांधकामाला नोटीस बजावली होती. त्यानंतर काम बंद असल्याने कारवाई केली नाही.
– सुनील यादव,
प्रभाग अधिकारी