कुटुंबियांवर होणा-या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एका युवकाने चक्क मंदिराचा कळस गाठून शोले स्टाईल आंदोलन केले.
शनिवारी दुपारी अचानक एक युवक गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील मंदिराच्या शिखरावर चढला. कुटुंबियांवर अत्याचार झाले असून पोलिस दखल घेत नसल्याचे तो ओरडून सांगत होता. ही बातमी सर्वत्र कळताच बघ्यांची एकच गर्दी उडाली आणि प्रशासनाची तारांबळ उडाली.
यानंतर त्या युवकाला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. पण तो कोणालाही दाद देत नव्हता. तब्बल तीन तास त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरु होते. शेवटी काही धाडसी युवकांनी महतप्रयासाने त्याला खाली उतरविले. पण त्यादरम्यान या युवकाने धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करुन घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. अधिक उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.