अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. सध्याच्या काळात घरगुती पौष्टिक जेवणपेक्षा बाहेरचे चमचमीत खाण्याकडे अनेकांचा कल असतो
अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. प्रत्येक जण स्वत:च्या परिस्थितीनुसार पोषक आहार घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सध्याच्या काळात घरगुती पौष्टिक जेवणपेक्षा बाहेरचे चमचमीत खाण्याकडे अनेकांचा कल असतो. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्याने अनेकांना आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे जगात अन्नपदार्थ खाताना जागरूकता वाढू लागली आहे. पोषक आहार घेतानाच त्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ नये याकडे सर्वजण लक्ष देऊ लागले आहेत. अमेरिकेसारख्या महासत्ता देशात अन्नसुरक्षेबाबत अधिक कडक कायदे आहेत. या कायद्यामुळे अन्न भेसळीपासून अनेक बाबींना आळा बसतो. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या नवीन निर्णयामुळे अन्न पदार्थ तयार करणा-या कंपन्यांवर मोठा वचक बसणार आहे. अमेरिकेत विकल्या जाणा-या प्रत्येक पदार्थावर उष्मांक आणि साखरेची माहिती देणारे लेबल लावणे सक्तीचे केले आहे.
गेल्या दोन दशकात स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: लहान मुलांचा त्याचा फटका बसत आहे. स्थूलतेमुळे मधुमेह, रक्तदाब आदींचे प्रमाणही वाढते. त्यामुळे आपण खालेल्या प्रत्येक अन्नात किती उष्मांक आहेत याची माहिती मिळणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आहारतज्ज्ञांनी व्यक्त केली. नवीन नियमानुसार प्रत्येक लेबलवर साखर, उष्मांकाचे प्रमाण स्पष्ट व मोठय़ा अक्षरात दिसणे गरजेचे आहे.
ओबामा प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या अध्यक्ष ओबामा यांच्या पत्नी मिशेल खूश झाल्या आहेत. पालक आणि ग्राहक दुकानात जाऊन खाद्यपदार्थ खरेदी करतात. त्यावेळी पदार्थ त्यांच्या शरीराला किती पोषक आहे याची माहिती त्याला तत्काळ कळायला हवी. ही माफक अपेक्षा आम्ही ठेवली आहे, असे मिशेल ओबामा यांनी सांगितले.
या नवीन नियमामुळे अन्नपदार्थ बनवणा-या कंपन्यांना अतिरिक्त २ अब्ज डॉलर्सचा भरुदड पडणार आहे. ही नवीन लेबल बनवण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नवीन निकष तयार केले आहेत. तसेच उत्पादक कंपन्यांसमोर लेबल बनवण्याविषयी दोन पर्याय ठेवले आहेत. सध्याचे लेबल अधिक मोठे करावेत किंवा पदार्थामधील स्थूलता, कर्बेोदके, साखर, प्रथिने यांची माहिती देण्यात यावी. त्यामुळे अमेरिकी नागरिकांना आपण किती पौष्टिक पदार्थ खात आहोत याची माहिती एका झटक्यात मिळणार आहे.