काँग्रेस पक्षाची धुरा हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे सातत्याने पक्षांतर्गत मोठे बदल करताना दिसत आहेत. या बदलांतर्गतच त्यांनी मंगळवारी अनेक मोठ्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाची धुरा हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे सातत्याने पक्षांतर्गत मोठे बदल करताना दिसत आहेत. या बदलांतर्गतच त्यांनी मंगळवारी अनेक मोठ्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे त्यांनी कोषाध्यक्षपद सोपवले आहे.
सुमारे दोन दशकांहून अधिक काळ ही जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे होती. व्होरा हे राज्यसभेचे सदस्य आहेत. व्होरा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे. दरम्यान, गांधी घराण्याचे निष्ठावंत अशी पटेल यांची ओळख आहे. योगायोगाने मंगळवारी पटेल यांचा वाढदिवस होता. पक्षाकडून त्यांना वाढदिवसाची ही भेट मिळाल्याचे बोलले जात आहे. अहमद पटेल हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
या निवडीबरोबरच आनंद शर्मा यांच्याकडे काँग्रेसच्या विदेश समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. आनंद शर्मा हे राज्यसभेचे सदस्य असून पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रिपद सांभाळले आहे. शर्मा हे मोदी सरकारला राज्यसभेत विदेश आणि आर्थिक धोरणावरून कोंडीत पकडत असतात.
ईशान्य भारताचे काँग्रेस सरचिटणीस आणि इनचार्ज डॉ. सी. पी. जोशी यांच्याकडील पदभार काढून, त्यांच्या जागी लुईझिन्हो फ्लेरिओ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याशिवाय, लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या कायमस्वरुपी निमंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी या नव्या नियुक्त्यांबाबत परिपत्रक काढले आहे. तसेच, या नव्या नियुक्त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.