भारताची नेमबाज राही सरनोबत हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज आहे..
जकार्ता/पॅलेमबॅन्ग- भारताची प्रतिभावंत नेमबाज राही सरनोबत हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज आहे.
२७ वर्षीय राहीचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. २०१४ इंचेऑन आशियाई स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्तुल सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळवले होते. भारताचे यंदाच्या स्पर्धेतील हे चौथे सुवर्ण आहे.
महिलांच्या २५ मी. पिस्तुल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबून हिच्याकडून कडवी झुंज मिळाली. राहीने अखेरच्या काही क्षणांमध्ये दमदार पुनरागमन केले आणि सुवर्णपदक पटकावले.
कोल्हापूरच्या राहीच्या सुवर्णयशाने क्रीडा स्तरावर आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक आजी-माजी क्रीडापटूंनी तिचे अभिनंदन केले आहे.
वुशूमध्ये भारताला चार कांस्यपदके
वुशू क्रीडा प्रकारामध्ये भारताला चौथ्या दिवशी चार कांस्यपदके मिळाली. ही पदके मिळवणा-यांमध्ये नोआरेम रोशिबिना देवीसह संतोष कुमार, सूर्या भानू प्रताप सिंग आणि नरेंदर ग्रेवाल यांचा समावेश आहे. महिलांच्या सांडा प्रकारात ६० किलो गटाच्या उपांत्य फेरीत नोआरेम हिला चीनच्या काइ यिंगयिंग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. पुरुषांमध्ये संतोष कुमार (५६ किलो गट), सूर्या भानू प्रताप सिंग (६० किलो) आणि नरेंदर (६५ किलो गट) यांनाही उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. दुखापतीची पर्वा न करता सूर्या याने कांस्यपदकाची कमाई केली.
सुवर्णपदक विजेत्याला ५० लाख रुपयांचे बक्षीस राज्य सरकारची घोषणा
मुंबई- आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख तसेच रौप्य आणि कांस्यपदक विजेत्याला अनुक्रमे ३० आणि २० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
भारताच्या खात्यात एकूण १५ पदके
४ सुवर्ण, ३ रौप्य, ८ कांस्य
पदकविजेते
>> सुवर्ण : बजरंग पुनिया (कुस्ती), विनेश फोगट (कुस्ती), सौरभ चौधरी, राही सरनोबत (दोन्ही नेमबाजी).
>> रौप्य : दीपक कुमार, लक्षय, संजीव राजपूत (नेमबाजी).
>> कांस्य : अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार (नेमबाजी), अभिषेक वर्मा (नेमबाजी), सेपक टकराव (पुरुष), दिव्या ककरन (कुस्ती), नोआरेम रोशिबिना देवी, संतोष कुमार, सूर्या भानू प्रताप सिंग आणि नरेंदर ग्रेवाल (सर्व वुशू).
टेनिस – बोपण्णा-शरणचे कांस्यपदक निश्चित
पॅलेमबँग – टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरन याने कांस्यपदक निश्चित केले. भारताच्या जोडीने चेंगपेंग सी-सुंग आणि हुआ यांग या चायनीज तैपेइ जोडीचा ६-३, ५-७, १०-१ असा पराभव करताना उपांत्य फेरी गाठली.
टेनिसपटू अंकिता रैनाला कांस्य टेनिसपटू अंकिता रैना हिला महिला एकेरीमध्ये कांस्यपदक निश्चित झाले आहे. उपांत्य फेरीमध्ये तिला पराभवाचा धक्का बसला.