गुजरातचा विकास झाल्याचा देशभरात दावा करणारे नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच गुजरातमधील गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
मुंबई- गुजरातचा विकास झाल्याचा देशभरात दावा करणारे नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच गुजरातमधील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. गुजरात पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीतूनच हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००१ ते २०१२ या कालावधीत बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, गाड्यांची चोरी आदी गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली. भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री असताना गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात माफियांचे राज्य असल्याची जाहिरातबाजी करीत गुजरातच्या विकासाचे मॉडेल दाखवणारे भाजपवाले मात्र, गुजरातमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीबाबत चकार शब्दही काढत नाहीत. गुजरात पोलिसांच्याच आकडेवारीवर लक्ष टाकले, तर २००१ ते २०१२ या काळात दोन-तीन वर्षाचा अपवाद वगळता गुजरातमध्ये गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ झाली. सर्वात गंभीर बाब म्हणजे मोदी यांच्या कार्यकाळात गुजरातमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दुप्पट वाढ झाली. गुजरात पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २००१ मध्ये गुजरातमध्ये २८६ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते.
२०१२ मध्ये बलात्काराचे गुन्हे ४७३ वर पोहोचले आहेत. हीच परिस्थिती महिला व मुलींच्या अपहरणासंदर्भात आहे. २००१ ते २०१२ या काळात महिला व मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली. याशिवाय महिलांना पतीकडून अथवा सासरच्या व्यक्तींकडून होणा-या त्रासाची आकडेवारीत १२ वर्षात जवळपास दुपटीने वाढ झाली.
ऑक्टोबर २००१ मध्ये मोदींनी गुजरातची धुरा प्रथमच सांभाळली होती. २००१ मध्ये गुजरातमध्ये १९३० दंगलीचे गुन्हे दाखल झाले होते. दुस-याच वर्षी त्यात दुपटीने वाढ होऊन २००२ मध्ये ३६६५ दंगलीचे गुन्हे दाखल झाले. याशिवाय गरीब व मध्यमवर्गीय व्यक्तींशी संबंध असलेल्या जबरी चोरी व गाडी चोरीच्या घटनांमध्येही मोदी यांच्या कार्यकाळात वाढ झाली. २००१ मध्ये गुजरातमध्ये ९९१ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते तर २०१२ मध्ये गुजरातमध्ये १३६६ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. गाडी चोरींच्या बाबतीत तीच परिस्थिती असून १२ वर्षात गाडी चोरीचे गुन्हे ५५०४ वरून ९०५७ वर पोहोचले. ही आकडेवारी पाहिल्यानंतर ‘कुठे नेऊन ठेवलंय तुमच्या गुजरातला?’ अशी बोलण्याची वेळ आली आहे.
गुजरातमधील गुन्हेगारीची आकडेवारी