मोठा खांदा गावाभोवतालच्या अवैध पार्किंगविरोधात गुरुवारी काँग्रेसने आंदोलनाचा दणका दिला.
पनवेल – मोठा खांदा गावाभोवतालच्या अवैध पार्किंगविरोधात गुरुवारी काँग्रेसने आंदोलनाचा दणका देताच, खडबडून जाग आलेल्या कामोठे पोलिस आणि वाहतूक विभागाने या परिसरात यापुढे कधीही अवैध पार्किंग होणार नाही, याची दक्षता घेत अवजड वाहने हटवण्याच्या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे.
मोठा खांदा गाव परिसरातील सेक्टर-१६ व १७, खांदेश्वर रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, ट्रायफेड टॉवरसमोरच्या रस्त्यावरील अवैध पार्किंग बंद करावी, तसेच वाहतूक शाखेच्या माध्यमातून या परिसरात गस्त घालण्यात यावी, परिसरात अवैध पार्किंग होणार नाही, याकडे लक्ष देऊन अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा येथील स्थानिक नगरसेविका अलका भगत यांनी कामोठे पोलिस ठाणे व वाहतूक शाखेला दिला होता. त्यानुसार कामोठे पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून या सर्व ठिकाणांवरील वाहनांवर कारवाई केली होती. मात्र पोलिसांची कारवाई थंडावताच, या जागेवर पुन्हा ट्रक तसेच कंटेनर पार्किंग केले जात होते. त्यामुळे गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन छेडल्याने पोलिस व वाहतूक शाखा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. या आंदोलनाच्या तीव्रतेची दखल घेत, पोलिसांनी तत्काळ कडक कारवाईचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देऊन, प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवातही केली आहे. यापुढे या परिसरात सातत्याने वाहतूक पोलिसांची गस्त ठेवणार असल्याचेही कामोठे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. जी. मुल्लेमवार यांनी सांगितले.
भरपावसात झालेल्या या आंदोलनात उपनगराध्यक्ष गणेश पाटील, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक गणपत म्हात्रे, नगरसेविका अलका भगत, कल्पना ठाकूर, नीता माळी, ग्राहक हित कक्षाच्या तालुकाध्यक्ष दर्शना भोईर, तालुका काँग्रेसच्या कार्याध्यक्ष रत्नप्रभा घरत, युवा कार्यकर्ता सतीश पाटील, रमेश भगत, एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष रोहित घरत, नितेश पाटील, दत्ता पाटील, परेश पाटील, अजय हुद्दार, यादव पाटील, कुंदन भगत, विजय भगत, रूपेश भगत, सचिन कासकर, अमोल भगत, प्रताप भगत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.