महापालिकेच्या सर्व स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनीऐवजी गॅसदाहिनी बसवण्याचा निर्णय घेणा-या प्रशासनाने मुंबईतील ३५ खासगी स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी बसवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई – महापालिकेच्या सर्व स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनीऐवजी गॅसदाहिनी बसवण्याचा निर्णय घेणा-या प्रशासनाने मुंबईतील ३५ खासगी स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी बसवण्याच्या सूचना केल्या आहेत.
सर्व खासगी स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी बंधनकारक करतानाच महापालिकेने या गॅसदाहिनीच्या शुल्काचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. खासगी स्मशानभूमी चालवणा-या संस्थांनी केवळ गॅसदाहिनी बसवून त्यांच्या देखभालीचा खर्च करायचा आहे.
मुंबईमध्ये मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी लागणारी ३०० किलोपर्यंतची लाकडे मोफत पुरवली जातात. त्यामुळे महापालिकेच्या अखत्यारीतील हिंदू स्मशानभूमींमध्ये प्रत्येक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी १,८९० रुपये खर्च येतो. मात्र हाच खर्च खासगी स्मशानभूमींमध्ये २,०१० रुपये आहे.
परंतु जळाऊ लाकडांचा होणारा अपव्यय आणि प्रदूषण यामुळे महापालिकेने सर्व हिंदू स्मशानभूमींमध्ये गॅसभट्टी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसदाहिनीचा वापर स्मशानभूमींमध्ये केल्यास प्रत्येक शवदहनासाठी सुमारे ६३० रुपये खर्च येईल. मात्र खासगी स्मशानभूमींमध्ये पारंपरिक लाकडाचा वापर करूनच अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे प्रतिदहनास २,०१० रुपयांचा खर्च येतो.
गॅसदाहिनीचा वापर केल्यास १,३८० रुपयांची बचत होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.पर्यावरणाचा विचार करता लाकडाचा वापर किफायतशीर नाही. त्यामुळे गॅसदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महापालिकेने पहिल्या टप्प्यात ९ स्मशानभूमींत गॅसदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याप्रमाणेच खासगी स्मशानभूमींनाही तशा सूचना करण्यात आल्या आहेत. या गॅसदाहिनीचे शुल्क महापालिकेच्या वतीने भरण्यात येईल. मात्र या शुल्काची बिले आर्थिक वर्षातच सादर करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. अर्थसंकल्पातही तशी तरतूद करण्यात येत असल्याचेही कार्यकारी आरोग्य अधिकारी
डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले. मुंबईत एकूण ३५ खासगी स्मशानभूमी असून, त्यांपैकी घाटकोपर पूर्व हिंदू स्मशानभूमी, मुलुंड पश्चिम आणि बाणगंगा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गॅसदाहिनी बसवण्यात आली आहे. या तिन्ही गॅसदाहिन्यांच्या शुल्कासाठी महापालिकेने अनुक्रमे साडेतीन लाख, सात लाख आणि साडेतीन लाख रुपयांची आर्थिक तरतूद केल्याचे डॉ. बामणे यांनी सांगितले.
मुंबईतील हिंदू स्मशानभूमी : ४६
खासगी हिंदू स्मशानभूमी : ३५
महापालिकेच्या स्मशानभूमीतील पारंपरिक अंत्यसंस्काराचा खर्च : १,८९० रुपये
खासगी स्मशानभूमीतील पारंपरिक अंत्यसंस्काराचा खर्च : २०१० रुपये
विद्युत दाहिनीवरील अंत्यसंस्काराचा खर्च : ७०० रुपये
गॅसदाहिनीवरील अंत्यसंस्काराचा खर्च : ६३० रुपये