मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात शनिवारी पहाटे गॅसवाहक टँकर दरीत कोसळला. त्यामुळे वायूगळती झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात टँकरचालकाचा मृत्यू झाला.
खेड- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात शनिवारी पहाटे गॅसवाहक टँकर दरीत कोसळला. त्यामुळे वायूगळती झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात टँकरचालकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. गोवा येथून प्रोपिलीन गॅस घेऊन हा टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर २०० फूट खोल दरीत कोसळला़ गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरून अवजड वाहनांना जिल्हाधिका-यांनी मनाई केलेली असतानाही वाहतूक सुरू असल्याचे या अपघातावरून स्पष्ट झाले.
अपघाताची माहिती मिळताच खेडचे पोलिस निरीक्षक विकास गावडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाला पाचारण केले. अपघातग्रस्त टँकर हरियाणा पासिंगचा असल्याने खेड तहसीलदार कार्यालय व पोलिस यंत्रणेने हरियाणा प्रशासनामार्फत तेथील आरटीओ अधिका-यांशी संपर्क साधला. तेथील अधिकारी शनिवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून टँकरचा मालक व मृत चालकाचे नाव समजू शकेल, अशी माहिती तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दिली़
टँकरच्या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, नजीकच्या खेड शहरातील नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या़ यामुळे तत्काळ नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. या वेळी आगीचे लोण भोस्ते घाटात दिसत होते.
अवजड वाहनांच्या बंदीचे काय?
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बंदी घातली असतानाही अवजड वाहतूक सुरूच असल्याचे या अपघातावरून स्पष्ट झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी याबाबत विचारणा केली असता, बंदी नसल्याचे पत्र आपल्याकडे आहे, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी पत्र दाखवण्याची विनंती केली असता महामार्ग पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे देत काढता पाय घेतला.