इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे, सोपे नाही. पहिली कसोटी केवळ तीन दिवसांत एक डाव आणि ८८ धावांनी जिंकत इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
हेडिंग्ले- इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे, सोपे नाही. पहिली कसोटी केवळ तीन दिवसांत एक डाव आणि ८८ धावांनी जिंकत इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा प्रभावी मारा हे यजमानांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. त्याने दोन्ही डावांत मिळून १० विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याला अन्य वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (४ विकेट) आणि दुस-या डावात स्टीव्हन फिनची (३ विकेट) चांगली साथ लाभली.
अँडरसन, ब्रॉड आणि फिन या वेगवान त्रिकुटासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांची पुरती तारांबळ उडाली. इंग्लंडच्या पहिल्या डावाइतक्या (२९८) धावा त्यांना दोन डाव मिळून करता आल्या नाहीत. पाहुण्यांचा पहिला डाव ९१ धावांवर संपला. २०७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेवर इंग्लंडने फॉलोऑन लादला.
कुशल मेंडिसच्या (५३) अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने दुस-या डावात शतकी (११९) मजल मारली तरी डावाचा मारा टाळण्यात त्यांना अपयश आले. इंग्लंडने एक (पहिला) डाव खेळताना २९८ धावा केल्या. त्यात जॉनी बेअस्टरेचे (१४०) मोलाचे योगदान राहिले. अँडरसनने सामन्यात दहा विकेट घेतल्या तरी शतकवीर बेअस्टरेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
हेडिंग्लेतील लीड्स मैदानावर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी कायम वर्चस्व राखले आहे. त्याची प्रचिती श्रीलंकेविरुद्धही आली. पहिल्या कसोटीतील डावाच्या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाहुण्या श्रीलंकेचे काही खरे वाटत नाही. मात्र फलंदाजी उंचावल्यास त्यांना यजमानांना थोडी फार चुरस देता येईल.