छोटया व्यावसायिकांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने २०,००० कोटी रुपयांचा राखीव निधी असलेल्या मुद्रा योजनेचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नवी दिल्ली- छोटया व्यावसायिकांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने २०,००० कोटी रुपयांचा राखीव निधी असलेल्या मुद्रा (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) योजनेचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
येत्या १२ महिन्यांमध्ये ही योजना बँकेत रूपांतरित केली जाईल. या योजनेत छोटया व्यावसायिकांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार असून देशातील ५.८ कोटी छोटया व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होईल.
छोटया व्यावसायिकांना आपली व्यावसायिक गरज पूर्ण करण्यासाठी ही बँक अस्तित्वात येणार आहे. १२ कोटी लोकांना रोजगार पुरवणा-या या छोटया व्यवसायांना अवघे ४ टक्केच संस्थात्मक निधी उपलब्ध होत असल्याची माहिती एका अधिका-याने दिली.
जनधन योजनेतून ‘बँकिंग फॉर अनबँकिंग’ हा उपक्रम राबवला जात असून त्याच धर्तीवर ‘फंड फॉर अनफंडेड’ हा उद्देश या बँकेच्या माध्यमातून साध्य केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी काढले.
अर्थसंकल्पात या बँकेची घोषणा करण्यात आली होती. मुद्रा बँकेचे बँकेत रूपांतर करण्यासाठी येत्या १२ महिन्यांमध्ये मुद्रा बँक विधेयक संसदेत मांडले जाईल, अशी माहिती वित्तीय सेवा सचिव हसमुख अधिया यांनी दिली.
बँकांना कृषीकर्जाच्या फेररचनेविषयी ‘आरबीआय’च्या सूचना
नवी दिल्ली- अवकाळी पाऊस आणि गारपिटीत पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याची माहिती रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी दिली. गेल्या महिन्यामधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीत उत्तर आणि पश्चिम भागात जवळपास ११३ लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, राजन यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना आर्थिक स्थिती आणि नवीन पतधोरणासंबंधीची नियमांची चौकट यावर खुली चर्चा करण्याची सूचना केली. त्याच वेळी त्यांनी अर्थ राज्यमंत्री आणि अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही या वेळी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.