भांडुप येथील प्लान्ट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) या संस्थेत एका जखमी पक्षीला त्याच प्रजातीची मादी चिमणी देखभाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई- एखाद्या पक्षाला मानवी स्पर्श झाला की, त्या पक्षाला इतर पक्षी टोचून मारतात. यासारखी अनेक उदाहणे आपण ऐकून आहात. भांडुप येथील प्लान्ट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) या संस्थेत एका जखमी पक्षीला त्याच प्रजातीची मादी चिमणी देखभाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे माणसा प्रमाणे प्राण्यामध्येही आपुलकीची भावना या उदाहरणातून दिसून येते.
पवई तलाव येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या चिमणीच्या लहान मादी बाळाला विष्णू नायर या प्राणीप्रेमीने पॉज या संस्थेत उपचारासाठी दाखल केले. जखमी मादी चिमणी अवघ्या काही महिन्याचे बाळ असावे, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. जखमी चिमणीला उपचारा करता दाखल करताना तिची अवस्था अत्यंत बिकट होती. या जखमी चिमणीचे पंख तयार झाले असून त्यात अजून उडण्याचे बळ आलेले नाही. अशी माहिती पॉजचे संचालक सुनीश कुंजू यांनी दिली. या जखमी चिमणीचा पिंजरा खिडकीजवळ ठेवण्यात आला होता. या चिमणीला भरवण्यासाठी प्रयत्न केला असतानाही या चिमणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु खिडकीबाहेरुन येणा-या चिमण्यांनी भरवलेला घास हे चिमणीचे बाळ सहज खात असल्याचे आमच्या लक्षात आले. रोज बाहेरुन येणा-या चिमण्यांपैकी कोणी एक चिमणा किंवा चिमणी या चिमणीच्या बाळाला भरवण्यासाठी येऊ लागले.
या चिमण्यांच्या नियमित देखभाली दरम्यान जखमी चिमणीच्या तब्येतीत चार दिवसांतच सुधारणा झाल्याचे कुंजू यांनी सांगितले. या चिमणीची तब्येत पूर्ण सुधारल्यानंतर आणि तिच्या पंखात बळ आल्यानंतरच या चिमणीला सोडण्यात येईल, अशी माहिती कुंजू यांनी दिली. अजून आठवड्याभराच्या पाहुणचारानंतर चिमणीची तब्येत पाहून तिच्या पिंज-याची खिडकी आम्ही मोकळी करु, त्यानंतर चिमणी आपोआपच या चिमण्यांच्या थव्यांसोबत उडून जाईल, अशी माहिती कुंजू यांनी दिली.