साबिन लिसिकी कोण, हा प्रश्न कुठल्याही टेनिस चाहत्याला पडणार नाही. सध्या सुरू असलेल्या विम्बल्डनमध्ये अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. याला कारणीभूत लिसिकी ठरली. तिने अप्रतिम खेळ करताना विल्यम्सला बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच विम्बल्डनमधील धक्कादायक निकालाची नोंद केली. महिला एकेरीतील अव्वल सीडेड विल्यम्सचे विम्बल्डनमधील आव्हान अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आले. गतविजेती तसेच डब्लूटीए क्रमवारीत अव्वल असलेली आणि फ्रेंच ओपन विजेत्या सेरेनाकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. ब-यापैकी सुरुवातही तिने केली होती. मात्र जर्मनीच्या २३ वर्षीय साबिन लिसिकीने सोमवारी तिची विजयी घोडदौड रोखली. लिसिकी ही डब्लूटीए क्रमवारीत सध्या ३५व्या स्थानी आहे. कारकीर्दीतील तिचे हे सर्वोत्तम रँकिंग आहे.
विम्बल्डनमध्ये तिला या वेळी २४वे सीडिंग आहे. २४व्या सीडेड टेनिसपटूने अव्वल सीडेड टेनिसपटूला हरवणे पटत नाही. मात्र कुठल्याही खेळात त्या त्या दिवशी सरस ठरणाराच बाजी मारतो. त्या वेळी तो सीडेड की बिनसीडेड किंवा त्याचे सीडिंग कितवे यावर काहीही ठरत नाही. पहिला सेट जिंकल्यानंतर सेरेनावर मात करू शकते, याची जाणीव लिसिकीला झाली. मात्र अनुभवी सेरेनाने एकहाती तिला जिंकू दिले नाही. दुसरा सेट जिंकत तिने आव्हान कायम ठेवले. तिसरा सेटही ब-यापैकी रंगला. मोक्याच्या क्षणी सेरेनाची सव्र्हिस भेदत लिसिकीने कारकीर्दीतील एक सवरेत्तम विजय नोंदवला. सेरेनावरील विजयानंतर लिसिकीने अपेक्षा वाढवल्यात. विम्बल्डनचा विचार करता उपांत्य फेरी ही तिची या स्पर्धेतील सवरेत्तम कामगिरी. दोन वर्षापूर्वी (२०११) अंतिम चार टेनिसपटूंमध्ये तिला स्थान मिळवता आले होते. यंदा त्याची पुनरावृत्ती करताना जेतेपद पटकवावे, असे समस्त जर्मनीवासीयांना वाटत आहे. २००६ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश करणा-या लिसिकीने एकेरीत ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र उंचावलेला खेळ पाहता तिला जेतेपदाची नक्कीच संधी आहे. आक्रमक टेनिसपटू म्हणून लिसिकीची ओळख आहे. तिची सव्र्हिस ‘पॉवरफुल’ असते.
१२० किमी प्रति तास वेगाने ती सव्र्हिस करते. बॅकहँडचे तसेच जमिनीलगतचे फटके अचूक परतवण्यात लिसिकीचा हातखंडा आहे. ग्रासकोर्टवर तिचा खेळ बहरतो. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय ऑल इंग्लंड क्लबवर आला आहे. महिला एकेरीतील अव्वल आठ जणींमध्ये लिसिकी जर्मनीची एकमेव टेनिसपटू आहे. भारतात तुलनेने कमी टेनिसचाहते असले तरी लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील धक्कादायक पराभवांनी चाहत्यांना काहीच सुचेनासे झाले आहे. पुरुष आणि एकेरीतील गतविजेते उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे यावेळच्या विम्बल्डनमध्ये कुणी तरी माजी विजेता बाजी मारेल किंवा नवा विजेता मिळेल, हे नक्की.