गेल्या काही वर्षात देशात जुन्या मोटारींची (युज्ड कार) बाजारपेठ चांगलीच वाढली आहे. ज्यांची नवीन मोटार घेण्याची ऐपत नाही अशांसाठी जुन्या मोटारी चांगला आणि लोकप्रिय पर्याय ठरत आहे. जुन्या मोटारींना केवळ प्रमुख शहरांतूनच मागणी नसून निमशहरी आणि अगदी ग्रामीण भागातही जुन्या मोटारींची खरेदी-विक्री होत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात या मोटारींची बाजारपेठ मोठय़ा प्रमाणात विस्तारेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
भारतातील सामान्य बाजार ब्रॅण्ड्समध्ये, नवीन वाहनविक्री समाधानात होंडा आणि मारुती सुझुकी आघाडीवर आहेत. तर गेल्या वर्षभरापासून महागाई, चढे व्याजदर आणि बाजारातील मंदीने मोटार उत्पादकांना हैराण केले आहे. विक्रीत दरमहा घसरण होत असून या कंपन्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. यामुळे मोटार उत्पादक वापर केलेल्या वाहनांच्या विक्रीचा विचार करत असल्याचे जे. डी. पॉवर एशिया पॅसिफिकने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. नव्या मोटारींवरील उत्पादनशुल्क आणि महामार्गकराचा बोजा ग्राहकाला उचलावा लागतो. याउलट जुनी मोटार खरेदी करताना अशा प्रकाराच्या कराचा भार ग्राहकावर लादला जात नाही.
गेल्या तीन वर्षात जुन्या मोटारींच्या विक्रीत सरासरी १० ते १५ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. ३७ टक्के ग्राहकांनी जुनी मोटार खरेदीच्या प्रक्रियेत इंटरनेटचा उपयोग केल्याची माहिती दिली. जुन्या मोटारीची खरेदी वित्तासह, व्यापार पर्याय आणि सेवा-संबंधी खरेदीदारांनी इंटरनेटचा मोठया प्रमाणात वापर केला आहे. तसेच इतर ग्राहकांनीही जुन्या मोटारींची वैशिष्टये जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर केल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या मंदीच्या स्थितीतही नव्या मोटारींपेक्षा जुन्या मोटारींची मागणी जास्त असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
जुन्या मोटारी मोटार उत्पादक कंपन्यांकडून प्रमाणित (सर्टिफाइड) करण्यात येत असल्याने ग्राहकांचा विश्वास बसला आहे. महिंद्रा, मारुती यांसारख्या कंपन्यांनी जुन्या मोटारींची विशेष शोरूमही सुरू केली आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना मोटारीची संपूर्ण चाचणी घेऊनच विक्री केली जाते. या सर्टिफाइड मोटार आणि नव्या मोटारींच्या किमतीत फारच थोडा फरक असतो, मात्र कंपनीकडून ती प्रमाणित केल्याने ग्राहकही निर्धास्तपणे अशा मोटारी खरेदी करत आहेत. तसेच या मोटारींवरही बँका आणि वित्तसंस्थांकडून अर्थसहाय्य उपलब्ध आहे. यामुळे ‘सर्टिफाइड युज्ड कार’च्या व्यवसायावर बडया मोटार उत्पादकांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. वापर केलेल्या जुन्या मोटारीसंबंधी आणि किमतीची योग्य माहिती वेबसाइटवर देऊन कंपन्यांनी पारदर्शकताही दाखवली आहे. या कृतींमुळे ग्राहकांना वाहनासंबंधीची योग्य दृष्टी मिळाल्यामुळे जुन्या मोटारीच्या खरेदीबाबत हमी मिळते, परिणामी ग्राहक ही मोटार खरेदी करण्याचा निर्णय घेतो, असे जे.डी. पॉवर एशिया पॅसिफिकचे कार्यकारी संचालक मोहित अरोरा यांनी सांगितले.
जुन्या मोटारींबाबत नवीन वाहन खरेदीदारांकडून विचारात घेण्यात आलेल्या विक्रीच्या अनुभवाच्या सात बाबींचा समावेश करण्यात आला. यामध्ये देयकाची प्रक्रिया, देयकाचा वेळ, विक्री मनुष्यबळ, विक्रीची उपक्रमशीलता, डीलरची सुविधा, कागदपत्रांची छाननी आणि व्यवहार यांचा मोटार उत्पादकांकडून विचार करण्यात आला. जुन्या मोटारींची मागणी लक्षात घेत अनेक कंपन्या या व्यवसायावर भर देत आहेत. या मोटारींमध्ये ग्राहकाला अनेक पर्याय वाजवी दरांत उपलब्ध आहेत. यामध्ये हॅचबॅक मोटारींपासून ‘एसयूव्ही’ आणि आलिशान मोटारीही उपलब्ध आहेत. या मोटारींचा देयकाचा कालावधीही अल्प आहे. त्यामुळेच याकडे ग्राहक मोठया प्रमाणात वळत आहेत. विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील वाढत्या सामंजस्यामुळे या व्यवसायातील समाधानात वाढ झालेली दिसून येते. उत्तम संवादात बहुतेक विक्रेत्यांनी वेळ दिल्याची बाब ग्राहकांनी नोंदवली. चाचणी फेरीच्या दरम्यान, विक्रेत्यांनी वाहनांची वैशिष्टये समाजावून सांगितली. जुन्या मोटारींना गेल्या काही महिन्यांत मागणी वाढल्याने विक्रीच्या प्रक्रियेत ग्राहकांना उत्तमरीत्या गुंतवून ठेवण्याच्या डीलरच्या क्षमतेत वाढ झाली आहे. या सर्व घटकांमुळे ग्राहकांसाठी खरेदी हा उत्तम अनुभव असल्याचे अरोरा यांनी सांगितले. या बाजारपेठेत विकासाच्या मोठया संधी असल्याने जुन्या मोटारींच्या डीलरची संख्या दिवसागणीक वाढत आहे. तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचाही या व्यवसायात मोठा वापर केला जात आहे. वेबसाइटच्या माध्यमातून देशभरात कुठेही जुन्या मोटारींची खरेदी आणि विक्री करणे शक्य झाले आहे.
खरेदीच्या एकंदरीत अनुभवाबाबत अत्यंत समाधानी असलेल्या ग्राहकांची, असमाधानी ग्राहकांच्या तुलनेत डीलरशिप आणि ब्रॅण्डच्या प्रति जास्त निष्ठा आहे.
डीलरशिपमध्ये खरेदीच्या अनुभवाबाबत अत्यंत समाधानी असलेल्या ग्राहकांपैकी ९१ टक्के ग्राहकांनी, खरेदीसंबंधी मित्र किंवा नातेवाइकांना आवर्जून सांगू, असा अभिप्राय दिला. भविष्यात हे मालक या ब्रॅण्डची पुन्हा खरेदी करतील किंवा त्याबाबत संबंधितांना सांगतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या मोटार बाजारपेठेतील १३ ब्रॅण्डपैकी मारुती सुझुकी आघाडीवर आहे. तर ह्युंदाय, महिंद्रा, होंडा आणि टोयोटानेही या बाजारपेठेत चांगला जम बसवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात मारुतीने तब्बल दोन लाख ५० हजार जुन्या मोटारींची विक्री केली. तर टाटा मोटर्सच्याही ९०,००० प्री ओन्ड मोटारींची विक्री झाली. सध्याची मंदी लक्षात घेत जुन्या मोटारींवर या कंपन्यांकडून भर दिला जाईल, असा अंदाज जे. डी. पॉवर एशियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
डिझेल मोटारींना प्राधान्य
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधील फरकाने जुन्या मोटारींच्या खरेदीवरही परिणाम केला आहे. पेट्रोलपेक्षा डिझेलवरील जुन्या मोटारींना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. स्विफ्ट, डिझायर, इनोव्हा या मोटारींच्या डिझेल मॉडेलला बाजारातून मोठी मागणी आहे. या मोटारींच्या नवीन मॉडेल्स खरेदी करण्यापेक्षा जुनी मोटार खरेदी करण्यासाठी अधिक ग्राहक आहेत. डिझेलवरील जुन्या मोटारींची मागणी प्रचंड असून त्यातुलनेत पुरवठा नसल्याने काही शहरांमध्ये या मोटारींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.