ठाणे परिवहन सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाही परिवहनमधील आर्थिक गळती मात्र काही केल्या थांबत नाहीय.
ठाणे – ठाणे परिवहन सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाही परिवहनमधील आर्थिक गळती मात्र काही केल्या थांबत नाहीय. एकीकडे कर्मचा-यांची थकित देणी देण्यास प्रशासनाकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे मात्र कोणताही फायदा करून न देणा-या एका सॉफ्टवेअर कंपनीला तिकीट व रोख विभागाचे वार्षिक ६५ लाखांचे काम देण्यात आल्याने परिवहन कर्मचा-यांत प्रचंड असंतोष आहे.
ठाणे परिवहनमध्ये वाहकांना बसमध्ये तिकीट विक्री करण्यासाठी वेगवेगळया रकमांचे तिकिटांचे ब्लॉक देण्यात येतात. तसेच झालेल्या तिकीट विक्रीचा हिशेब वाहकाचे काम पूर्ण झाले की घेतला जातो. हे काम परिवहनच्या खिडकीवर परिवहनचे कर्मचारी करत होते, मात्र काही महिन्यांपासून हे काम गोरेगाव येथील एवॉन सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी कंपनीला वर्षाला ६५ लाखांचा मोबदला परिवहनच्या तिजोरीतून देण्यात येणार आहे.
सॉफ्टवेअर कंपनीने तिकीट व रोख विभागाच्या काउंटरवर मोजकेच तरुण अल्प मोबदल्यात कामावर ठेवले आहेत. मात्र वेळोवेळी येणा-या व्यत्ययामुळे हे सॉफ्टवेअर वेळखाऊ ठरत असल्याने वाहका खिडकीवर लांबच लांब रांगा लागतात. परिणामी बसगाडयांच्या फे-यांवरही परिणाम होतो, अशी माहिती काही वाहकांनी दिली. त्यात न घेतलेल्या तिकिटाचा हिशेबदेखील वाहकाला घ्यावा लागत असल्याने वाहकांची मोठी पंचाईत होते. सॉफ्टवेअर सव्र्हरच्या कामासाठी कंपनीने नियुक्त केलेले कामगार रात्रीच्या सुमारास डय़ुटीवर उपलब्ध नसल्यास वाहकांना चुकीच्या नोंदी निस्तारण्यासाठी रात्र रात्र जागावे लागते.
यापूर्वी परिवहनचे कर्मचारी हे काम करत होते. मात्र सॉफ्टवेअर कंपनीला काम दिल्यापासून यात अनेक त्रुटी निर्माण होत आहेत. त्यामुळे तिकीट व रोख विभागात काम करणा-या कर्मचा-यांपोटी वर्षाला जेमतेम ५ ते ६ लाख रुपये खर्च येत असताना परिवहन ६५ लाख रुपये या सॉफ्टवेअर कंपनीला का देते, असा प्रश्न कर्मचा-यांकडून विचारण्यात येत आहे. या संदर्भात परिवहन व्यवस्थापकांकडे काहीही माहिती उपलब्ध नसून या कामाचा ठेका देण्याचे काम ठाणे महापालिकेकडून झाल्याने या कामाबाबत परिवहनने कानावर हात ठेवले आहेत. तर स्थापत्य विभागाकडे चौकशी केली असता एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केले जात आहेत.
परिवहनमध्ये यापूर्वी कार्यरत असलेले अधिकारी अशोक बरपुल्ले यांच्या काळात ही सॉफ्टवेअर कंपनी आली असल्याने त्यांनाच याबाबत अधिक माहिती असावी, असेही उत्तर परिवहनमधून देण्यात आले आहे. परिणामी हे काम खासगी ठेकेदाराला देण्यामागे कोणाचे आर्थिक संबंध आहेत, याचा उलगडा व्हावा, अशी मागणी परिवहनच्या कर्मचा-यांनी केली आहे.