दिल्ली पोलिस दलातील शिपाई सुभाष तोमर यांच्या मृत्यू प्रकरणातील आठही आरोपींना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी क्लीनचीट दिली.
नवी दिल्ली – दिल्ली पोलिस दलातील शिपाई सुभाष तोमर यांच्या मृत्यू प्रकरणातील आठही आरोपींना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी क्लीनचीट दिली. गेल्यावर्षी डिसेंबरमहिन्यात, दिल्लीत सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधात आंदोलन सुरु असताना तोमर यांचा मृत्यू झाला होता.
जमावाच्या मारहाणीत तोमर यांचा मृत्यू झाल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप होता. मात्र त्यांना आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करता आले नाहीत. दिल्ली पोलिसांच्यावतीने युक्तीवाद करणारे अँडिशनल सॉलिसिटर जनरल सिध्दार्थ लुथ्रा यांनी तोमर यांच्या मृत्यूमध्ये आठही आरोपीं विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत असे न्यायालयाला सांगितले.
मात्र इंडिया गेटवजळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यामध्ये हे आठही आरोपी सहभागी असून, त्यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आरोपींवरील सर्व आरोप रद्द करण्यासाठी सोमनाथ भारती यांनी ही याचिका दाखल केली आहे. २० मार्चला यावर अंतिम सुनावणी होणार आहे.
इंडियागेट जवळ जमावाच्या मारहाणीत तोमर यांचा मृत्यू झाल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा होता मात्र जमावाचा पाठलाग करत असताना तोमर कोसळले, त्यांना आंदोलकांकडून कोणतीही मारहाण झाली नाही अशी साक्ष दोघांनी दिली होती.