सोमवारी होणा-या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे तगडे संघ भिडतील.
चितगाव- टी-२० वर्ल्डकपमध्ये सोमवारी होणा-या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे तगडे संघ भिडतील. अपयशी सलामीनंतर फाफ डु प्लेसिस आणि सहका-यांना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. याउलट सलामीला पावसाने तारले तरी ब्रेंडन मॅककलम आणि कंपनीचा खरा कस लागेल.
दक्षिण आफ्रिका एक चांगला संघ असला तरी निर्णायक क्षणी ढेपाळण्याची त्यांची सवय सलामीला श्रीलंकेविरुद्ध दिसली. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या आणि तळातील फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांची विजयाची संधी हुकली. आव्हान कायम ठेवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध द. आफ्रिकेला विजय आवश्यक आहे. त्यासाठी आघाडीच्या फळीला सातत्य राखताना शेवटपर्यंत मैदानावर थांबावे लागेल. दक्षिण आफ्रिकेला दुखापतीची चिंताही भेडसावत आहे. मात्र सोमवारची लढत त्यांच्यासाठी ‘करो आणि मरो’ अशी आहे. इंग्लंडविरुद्ध पावसाने तारले तरी मॅककलम आणि सहका-यांना शेफारून जाऊन चालणार नाही. तुलनेत दक्षिण आफ्रिका संघ तुल्यबळ आहे. मात्र सातत्य राखल्यास आणि प्रतिस्पध्र्याच्या कमकुवत बाबी हेरल्यास न्यूझीलंडला सलग दुस-या विजयाची संधी आहे.
वेळ : दु. ३ वा.