लग्रो इंडिया प्रस्तुत नवी कोरी आणि उत्साहपूर्ण वेबमालिका ‘द गुड व्हाइब्ज’च्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावरचे सर्वात लाडके जोडपे अर्थात नवीन कस्तुरिया आणि मानवी गग्रू पुन्हा एकदा डिजिटल मंचावर अवतरणार आहे. या वेबमालिकेचे कथानक लक्ष्य (नवीन) आणि जोनिता (मानवी) या तरुण जोडप्याभोवती फिरते. जुहूच्या एका आलिशान बंगल्यामध्ये राहणारी हे दोघे आपल्या नात्यामधील हरवलेले प्रेम आणि स्वीकार यांचा नव्याने शोध कसा घेतात, याचा प्रवास या कथेतून उलगडण्यात आला आहे. ‘द गुड व्हाइब्ज’ ही लग्रोची पहिलीच स्व-निर्मित वेबमालिका आहे.
‘द गुड व्हाइब्ज’ ही मालिका म्हणजे, आजच्या युगामध्ये शहरात राहणा-या जोडप्यांच्या रोजच्या जगण्याचे यथार्थ चित्र उभे करणारी एक मनस्वी गोष्ट आहे. हास्यरसाचा तलम पदर असलेले हे कथानक नात्यामधील मैत्री, प्रणय, नातीगोती आणि पालकत्व अशा सगळय़ा पैलूंना स्पर्श करते. लक्ष्य (नवीन) आणि जोनिता (मानवी) हे त्यांच्या सामाजिक वर्तुळामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असलेले जोडपे आहे.
आता मात्र हे जोडपे अशा एका भावनिक टप्प्यावर उभे आहेत, जिथे त्यांना आपले वैवाहिक नाते पुन्हा तपासून पाहण्याची गरज जाणवते आहे. ‘द गुड व्हाइब्ज’ ही मालिका अवघ्या ६ भागांमध्ये आटोपशीरपणे बसवण्यात आली आहे. ही वेबमालिका सोनी लिव्ह आणि लग्रो, इंडियाच्या यू टय़ूब चॅनेलवर उपलब्ध असणार आहे. या मालिकेच्या प्रक्षेपणाला ८ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. दर आठवडय़ाला नव्या भागाचे ऑनलाईन प्रसारण केले जाईल.