आयपीएल नवव्या हंगामातील शुक्रवारी (२९ एप्रिल) होणा-या लढतीत गहुंजे (पुणे) स्टेडियमवर रायझिंग पुणे सुपरजायंट्स घरच्या मैदानावर फॉर्मात असलेल्या गुजरात लायन्सशी दोन हात करेल.
पुणे- आयपीएल नवव्या हंगामातील शुक्रवारी (२९ एप्रिल) होणा-या लढतीत गहुंजे (पुणे) स्टेडियमवर रायझिंग पुणे सुपरजायंट्स घरच्या मैदानावर फॉर्मात असलेल्या गुजरात लायन्सशी दोन हात करेल. या सामन्याद्वारे महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना एकमेकांसमोर उभे ठाकतील.
सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत पुण्याने पराभवाची मालिका खंडित केली. त्या विजयामुळे धोनी आणि सहका-यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. परंतु, सहापैकी केवळ दोन सामने जिंकलेल्या पुण्याला आणखी एका विजयाची नितांत आवश्यकता आहे. प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. शिवाय चांगलाच फॉर्मात आहे. सहापैकी पाच सामने त्यांनी जिंकलेत. मागील दोन लढतीतही गुजरातने प्रतिस्पध्र्याना हरवले आहे.
अजिंक्य रहाणेसह फाफ डु प्लेसिसने पुण्याचा फलंदाजीचा भार पेलला आहे. मात्र डु प्लेसिसचे बोट दुखावल्याने उर्वरित स्पर्धेला तो मुकला आहे. केव्हिन पीटरसन पाठोपाठ डु प्लेसिसला बाहेरचा रस्ता धरावा लागल्याने पुण्याची फलंदाजी अधिकच कमकुवत झाली आहे.
लेगस्पिनर मुरुगन अश्विन आणि थिसरा परेराने थोडा प्रभाव पाडला तरी गोलंदाजीतही आलबेल नाही.
गुजरात लायन्सने सर्व आघाडय़ांवर कामगिरी उंचावली आहे. सलामीवीर आरोन फिंचचे सातत्य तसेच दिनेश कार्तिक, कर्णधार रैना आणि ब्रेंडन मॅककलमच्या चांगल्या योगदानामुळे त्यांची फलंदाजी उंचावली आहे.
मध्यमगती ड्वायेन ब्राव्हो आणि धवल कुलकर्णी तसेच लेगस्पिनर प्रवीण तांबेमुळे गोलंदाजीही सर्वसमावेशक वाटते.
वेळ : रा. ८ वा.