सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेची १९ केंद्रांवरची प्राथमिक फेरी तीन-चार दिवसांपूर्वीच संपली. आता नजर खिळली आहे, बालनाट्य स्पर्धेवर. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील वेगवेगळ्या सात गावांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या प्रयोगाचा पडदा २४ डिसेंबरला बीड केंद्रावर उघडला जाणार असून, या केंद्रावर तब्बल ३७ बालनाट्य सादर होणार आहेत. त्यानंतर २५ डिसेंबरपासून नागपूर, नाशिक, २ जानेवारीपासून अमरावती, कोल्हापूर, ५ जानेवारीपासून मुंबई तर ६ जानेवारीपासून पुण्यात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रातील १५ वर्षाखालील कलावंतांच्या नाट्यगुणांची पारख करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्रपणे बालनाट्य स्पर्धा आयोजित करते. नाट्यकलेमध्ये वेगवेगळ्या कलांचाही अंतर्भाव होत असल्याने, ते कलागुण आपोआपच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यातही हातभार लावणारे असते. त्यामुळे या स्पर्धेकडे पाहताना फक्त स्पर्धा म्हणून पाहणे उचित ठरणार नाही, ती महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील, संस्थांमधील एक चळवळ होणे गरजेचे आहे.
या वर्षी बालनाट्य स्पर्धेत सहभागी होणा-यांची संख्या पाहिली तर ती साधारणत: १९०च्या घरात जाते. वेगवेगळ्या सांस्कृतिक संस्थांसह काही शाळाही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राज्यभरात असणा-या शाळांची संख्या आणि या स्पर्धेतील सहभागी होणा-या संस्थांचा विचार केला तर तो मेळ जुळत नाही. त्यामुळे या स्पर्धेविषयीची शालेय संस्थांना असणारी उदासीनताच अधोरेखित करणारी आहे, असे म्हणावे लागेल. दोष फक्त शैक्षणिक संस्थांना देऊन चालणार नाही, तर या स्पर्धेविषयीची साधी माहिती तरी राज्यभरातील सा-या शैक्षणिक संस्थांना आहे काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. हे सारे प्रश्न उपस्थित करण्यामागचा हेतू हा केवळ दोषारोप करण्याचा नाही. ही स्पर्धा १५ वर्षाखालील बालकांसाठी आयोजित करण्यात येते आणि या वयोगटातील बहुसंख्य विद्यार्थी हे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांशीच नाते सांगणारे असतात. त्यामुळे या स्पर्धेत मोठय़ा संख्येने शालेय विद्यार्थ्यांचा अर्थात शैक्षणिक संस्थांचा सहभाग असण्याची अपेक्षा व्यक्त करणे गैर ठरू नये. त्यानुसार राज्यभरातील शैक्षणिक संस्थांची संख्या लक्षात घेता सहभागी होणा-या संस्था या अत्यल्पपेक्षाही कमी आहेत.
राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि शिक्षण खाते यांनी संयुक्तपणे या स्पर्धेतील सहभाग वाढवण्यासाठी विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये नाटकाविषयीची आवड निर्माण करावी लागणार आहे. अनेक दिवसांपासून शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षण हा विषय समाविष्ट करावा, अशी मागणी होत आहे. त्याकडे आजवर दुर्लक्षच झाले. राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये नाट्यशिक्षण देणारे स्वतंत्र विभाग आहेत. मात्र शालेय शिक्षणात हा विषय नसल्याची उणीव वारंवार व्यक्त झाली आहे. ही उणीव दूर झाल्यास वेगवेगळ्या संस्थांमधून नाट्यशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना नाट्यशिक्षक म्हणून काम करता येईल. शालेय संस्थांमध्ये नाटकाचे वातावरण निर्माण होईल. त्यातून या स्पर्धेतील स्पर्धक संस्थांचीही संख्या वाढू शकेल. या स्पर्धेचा दर्जाही वाढेल आणि आपोआपच आता राज्यभरात मोजक्य केंद्रांवर होणारी ही स्पर्धा जिल्हानिहाय घ्यावी लागेल. हे सारे तडकाफडकी होणार नाही, हे गृहीत धरून या वर्षीच्या बालनाट्य स्पर्धेतून छोट्या दोस्तांच्या नाट्यगुणांची पारख सांस्कृतिक कार्य संचालनालयाला करायची आहे.
बालनाट्य स्पर्धा वेगवेगळ्या सात गावांत घेण्यात येत असली तरी केंद्रांची संख्या फक्त पाच आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. कोल्हापूर येथे १८ आणि पुणे येथे सादर होणा-या २२ अशा ४० नाटकांतून पहिल्या तीन क्रमांकाची नाटके अंतिम फेरी गाठणार आहेत. याशिवाय अपंग कलावंतांचे एक नाटकही अंतिम फेरीसाठी निवडले जाईल. हेच गणित नागपूर (२२) आणि अमरावती (२०) येथे होणा-या नाटकांसाठी लागू होणार आहे. या दोन गावांत सादर होणा-या एकूण ४२ नाटकांतून तीन अधिक अपंग कलावंतांचे एक अशी चार नाटके अंतिम फेरीत जातील. मुंबईतील साहित्य संघ मंदिरात या स्पर्धेतर्गत एकूण ३८ नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. नाशिकमध्ये २०, बीडमध्ये ३७ नाटकांचे प्रयोग होतील. त्या प्रत्येक केंद्रांतून तीन अधिक एक अपंग विद्यार्थी कलावंतांचे नाटक अंतिम फेरी गाठतील. राज्यभरातील २० नाटकांची अंतिम फेरी
होणार आहे.
बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा.
संगीत रत्नागिरीत; हिंदी नाशिकमध्ये!
कोकणातील नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. १५ जानेवारीपासून सुरू होणारी हौशी संगीत नाट्य स्पर्धा या वर्षी रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत चालणा-या स्पर्धेत महाराष्ट्रासह गोव्यातील वेगवेगळ्या संस्था एकूण २० नाटकांचे सादरीकरण करणार आहेत. हिंदी नाट्य स्पर्धा नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १० जानेवारीपासून सुरू होणार असून, ती ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था ३९ नाटकांचे सादरीकरण करणार आहेत.
संगीत नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा.
हिंदी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा.