सीबीडी येथे वास्तव्यास असणा-या २३ वर्षीय तरुणीने चौगुले यांच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करत थेट सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
नवी मुंबई- शिवसेनेचे नवी मुंबईतील जिल्हाप्रमुख विजय चौगुले पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. सीबीडी येथे वास्तव्यास असणा-या २३ वर्षीय तरुणीने चौगुले यांच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करत थेट सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात चौगुले यांचा कर्मचारी तानाजी सुर्वे याचेही नाव असल्याने पोलिसांनी त्याला अटक करून नंतर जामिनावर सुटका केली आहे. तीन वर्षापासून चौगुले धाकटपशा दाखवून आपल्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
पूर्वी कोपरखैरणे येथे वास्तव्यास असणारी, ही तरुणी सध्या सीबीडी येथे राहात आहे. गोवा, लोणावळा, खारघर आदी ठिकाणी नेऊन चौगुले आपल्यावर बलात्कार करत होते, असे या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. राष्ट्रवादीच्या विलास जाधव हत्याकांड प्रकरणात चौगुले यापूर्वीच अडकले आहेत. आता बलात्काराच्या गुन्ह्यातही अडकल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र चौगुले यांनी हे आरोप फेटाळून लावत, हे राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी संपूर्ण तपास करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.
विजय चौगुले यांनी नुकतीच विधानसभेची निवडणूक ऐरोलीतून लढवली आहे. राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांनी त्यांचा साडेआठ हजार मतांनी पराभव केला आहे. सिडकोच्या संचालकपदीही ते १० वर्षे होते. नवी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पहिले आहे. ७ वर्षे ते नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. दोन विधानसभा आणि एक वेळा लोकसभेत त्यांचा पराभव झाला आहे. राज्यव्यापी ‘मी वडार’ या संघटनेचे ते संस्थापक- अध्यक्षही आहेत.