प्रो-कबड्डी लीगच्या दुस-या मोसमातील साखळी लढतीत शुक्रवारी दबंग दिल्लीविरुद्ध खेळ बहरला तरी पुणेरी पलटनला ३८-३७ अशा एका गुणाने मात खावी लागली.
कोलकाता- प्रो-कबड्डी लीगच्या दुस-या मोसमातील साखळी लढतीत शुक्रवारी दबंग दिल्लीविरुद्ध खेळ बहरला तरी पुणेरी पलटनला ३८-३७ अशा एका गुणाने मात खावी लागली. यंदाच्या हंगामातील त्यांचा हा सलग तिसरा पराभव आहे. याऊलट दिल्लीने पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली.
पहिल्या सत्रात १२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पुणेरी संघाने दुस-या सत्रात खेळ उंचावताना दिल्लीवर दोनदा लोण चढवला. त्याचे श्रेय कर्णधार वझिर सिंगसह (१३ गुण) प्रवीण नेवाळेला (८ गुण) जाते. वझिरने जवळपास प्रत्येक चढाईत गुण घेतला. दोन्ही संघांनी जशास तसा खेळ केल्याने शेवटच्या पाच मिनिटांत बरोबरी किंवा एक-दोन गुणांचा फरक राहिला.
सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना पुण्याचा कर्णधार वझिरने वेळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका त्यांना बसला शेवटच्या चढाईत काशिलिंग आडकेने यशस्वी चढाई करताना ३७-३७ अशी बरोबरी साधली. ही चढाई निर्णायक ठरली. या गुणाने आत्मविश्वास उंचावलेल्या दबंग दिल्लीने शेवटच्या चढाईत वझिरची अचूक पकड केली आणि एका गुणाने नेत्रदीपक विजय मिळवला. दिल्लीचा हा पहिलाच विजय आहे.
काशिलिंग आडकेसह (१२ गुण) रोहित कुमार चौधरीने (११ गुण) दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दुकलीच्या यशस्वी आणि प्रभावी चढायांमुळे दिल्लीने पहिल्या सत्रात मोठी आघाडी घेतली. त्यांनी पुणेरी पलटनवर दोन लोण चढवले. मात्र आघाडी राखताना दिल्लीला अपयश आले. मात्र शेवटच्या काही मिनिटांतील काशिलिंगच्या खेळाने त्यांना पहिल्या विजयाला गवसणी घालता आली.