जर्मन एअरलाईन्सच्या एका प्रवासी विमानाला मंगळवारी फ्रान्समध्ये भीषण अपघात झाला.पॅरीस- लुफ्तांसा एअरलाईन्सच्या ‘जर्मन एअरविंग्ज’ या उप कंपनीचे विमान फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत मंगळवारी कोसळले. या अपघातात १४२ प्रवासी व ६ विमान कर्मचारी असे एकूण १४८ जण ठार झाले आहेत. फ्रान्समध्ये झालेल्या अपघातानंतर जगभरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्पेनमधील बर्सिलोना येथून हे विमान जर्मनीच्या डुसेलडॉर्फ शहराकडे निघाले असताना फ्रान्सच्या हद्दीत आल्प्स पर्वतराजीत ते स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.३० वाजता कोसळले. हे विमान एअरबस ए ३२० जातीचे असून पाच हजार फुटांवरून उड्डाण करत असताना त्याने आपात्कालीन परिस्थितीत असल्याचे संदेश पाठवले होते.
या विमानात स्पेन, जर्मन आणि तुर्कस्थानचे प्रवासी मोठय़ा संख्येने होते, अशी माहिती फ्रान्सच्या हवाई खात्याने दिली.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस होलांद यांनी सांगितले की, हे विमान आल्प्स पर्वतराजीतील ‘लेस ट्राइस इव्हेच’ या अत्यंत दुर्गम भागात कोसळले आहे. हे ठिकाण १४०० मीटर उंचीवर आहे. फ्रेंच पोलिसांची हेलिकॉप्टर्स दुर्घटनास्थळी रवाना झाली आहेत. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांचे आपण सांत्वन करत आहोत. होलांद यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अॅँजेला मर्केल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून शोक व्यक्त केला.
दरम्यान, फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी विमान दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून मदतकार्याला सुरुवात झाल्याचे सांगितले.