संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा कायम ठेवण्याबाबत बहुजन समाजवादी पक्ष बुधवारी अंतिम निर्णय घेणार आहे.
लखनऊ – संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा कायम ठेवण्याबाबत बहुजन समाजवादी पक्ष बुधवारी अंतिम निर्णय घेणार आहे. केंद्र सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी बैठक होणार आहे. त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल असे मायावती म्हणाल्या. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या सहाव्या स्मृतीदिनी संकल्प महारॅलीला संबोधित करताना मायावती यांनी ही घोषणा केली.
मायावती यांच्या बसपाचे लोकसभेत २१ खासदार आहेत. समाजवादी पक्षासह त्यांनी संपुआ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. आपल्या भाषणात त्यांनी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूकांची शक्यता व्यक्त करताना पक्ष कार्यकर्त्यांना संभाव्य निवडणूकीसाठी सज्ज रहाण्याच्या सूचना केल्या. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाकडून दणदणीत पराभव झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच जाहीर सभा होती.
या सभेत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. पण त्याचवेळी रिटेलमधील परकीय गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारण्याची तयारीही दाखवली. परकीय गुंतवणूकीने शेतकरी आणि छोटया व्यापा-यांचे हित जपले गेले तर, आम्ही एफडीआयचे स्वागत करु असे त्या म्हणाल्या. पण तूर्तास आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
[EPSB]
मायावती विरोधात चौकशीस सीबीआय स्वतंत्र
बसप प्रमुख मायावती यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चौकशी करण्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग पूर्ण स्वतंत्र आहे.
[/EPSB]