अहमदनगर जिल्हा परिषदेने संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसवण्याच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अहमदनगर- अहमदनगर जिल्हा परिषदेने संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसवण्याच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी केल्यानंतर जोरदार चर्चेअंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसवण्याचे काम पूर्ण झालेले असताना अनेक शाळांमधील मशिन गायब आहेत. त्यामुळे या कामात तब्बल ८७ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून या भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी विभागामार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी केली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत बायोमेट्रिक घोटाळ्याचा विषय चांगलाच गाजला. नवीन काळानुसार चालण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसवण्याचा निर्णय घेतला होता.
पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन लावण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या योजनेकरिता राज्य सरकारने एक कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. संगमनेर तालुक्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिनसाठी ८७ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले. मात्र अनेक शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बिलापोटी दिलेली ८७ लाखाची रक्कम कोठे गेली, असा सवाल दहातोंडे यांनी उपस्थित केला. तसेच बायोमेट्रिक मशिनचा विषयदेखील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला गेला नाही. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने या प्रकाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी, अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी लावून धरली. दरम्यान बायोमेट्रिक व्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदार कंपनीला उर्वरित बिलाची रक्कम अदा करू नये, अशी सूचना दहातोंडे यांनी केली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्यासहित सर्व सदस्यांनी दहातोंडे यांच्या मागणीचे समर्थन करून बायोमेट्रिक मशिन व्यवहाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्याचा निर्णय घेतला.