रेआल माद्रिद आणि बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे.
माद्रिद / बार्सिलोना – रेआल माद्रिद आणि बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये बुधवारी बार्सिलोनाने रेआल सोशियॅडॅडवर २-० अशी मात केली. अन्य लढतीत माद्रिदने स्थानिक प्रतिस्पर्धी आणि गतविजेत्या अट्लेटिको माद्रिदवर ३-० असा सहज विजय मिळवला.
गतवर्षीच्या ‘फायनल’मधील पराभवाचा सव्याज बदला माद्रिदने अट्लेटिकोविरुद्ध घेतला. पेपे (१७व्या मिनिटाला), जेस रॉड्रिग्ज (५७व्या मिनिटाला) आणि अँजेल डि मारियाच्या (७३व्या मिनिटाला) अप्रतिम गोलांमुळे रेआलला विजय मिळवण्यासाठी फार प्रयास पडले नाहीत. या पराभवामुळे अट्लेटिको माद्रिदची सर्व स्पर्धामिळून २३ सामन्यांतील विजयी परंपरा खंडित झाली. याउलट तितकेच सामने खेळताना रेआल अजिंक्य आहे.
उपांत्य फेरीतील दुसरा लेग मंगळवारी (११ फेब्रुवारी) व्हिसेंट कॅल्डेरॉनमध्ये होईल. त्यावेळी केवळ बरोबरीही माद्रिदला अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी पुरेशी ठरेल. पहिल्या लेगमधील विजयानंतर रेआलचे मॅनेजर कालरे अॅन्सेलोटी यांनी सर्व फुटबॉलपटूंची प्रशंसा केली आहे.
अन्य उपांत्य लढतीत सर्जिओ बुस्केट्सने ४४व्या मिनिटाला केलेला गोल बार्सिलोनाला तारून गेला. त्यातच प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर इनॉट झुबिकराइच्या (६०व्या मिनिटाला) स्वयंगोलमुळे त्यांना २-० असा विजय मिळवता आला. ‘स्टार’ फुटबॉलपटू लिओनेल मेसीला सलग पाचव्या लढतीत गोल करता आला नसला तरी बार्सिलोनाने सामन्यावरील पकड ढिली होऊ दिली नाही.
पहिल्या सत्रातील आघाडीनंतर रेआल सोशियॅडॅड संघ पुनरागमन करेल, असे वाटले. मात्र झुबिकराइची ‘चूक’ त्यांना महागात पडली. गोरका लुस्टोंडोचा चेंडू ‘क्लियर’ करण्याच्या प्रयत्नात झुबिकराइचा ‘रिबाउंड’ गोलपोस्टमध्ये गेला.