स्मार्टफोन उत्पादक ब्लॅकबेरीला ३१ ऑगस्ट रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत ९६ कोटी ५० लाख डॉलर्सचा तोटा झाला.
न्यूयॉर्क- स्मार्टफोन उत्पादक ब्लॅकबेरीला ३१ ऑगस्ट रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत ९६ कोटी ५० लाख डॉलर्सचा तोटा झाला. स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंग, अॅपलकडून मिळणा-या कडव्या स्पर्धेमुळे कंपनीला सातत्याने तोटा होत आहे. त्याचबरोबर ‘झेड १०’ या स्मार्टफोनवर आकारल्या गेलेल्या इन्व्हेंटरी चार्जेसमुळे कंपनीला या तिमाहीत मोठा फटका बसला.
या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ४९ टक्क्यांची घट झाली आहे. या तिमाहीत १.६ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला. तर २०१२च्या याच तिमाहीत कंपनीला २.९ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला होता. २३ कोटी ५० लाख डॉलर्सचा तोटा झाला होता. ब्लॅकबेरीने भारतीय वंशाचे कॅनडातील उद्योगपती व्ही. प्रेम वत्स यांच्या फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंगशी ४.७ अब्ज डॉलरचा करार केला आहे. सातत्याने तोटा होत असल्याने कंपनीचा शेअरही मोठय़ा प्रमाणात घसरला असून बाजारातील भांडवलावर परिणाम झाला आहे.
आर्थिक निकाल निराशाजनक आहेत. आर्थिक स्थितीला सावरण्यासाठी काही संरचनात्मक बदल केले जाणार आहेत. तसेच कार्यपद्धतीतही बदल करण्याचे संकेत ब्लॅकबेरीचे अध्यक्ष थॉरस्टन हेन्स यांनी दिले. हार्डवेअर व्यवसायात कंपनीकडून कार्यपद्धत बदलण्यात आली आहे. यामध्ये बीईएस १० या मॉडेलमधून चांगला व्यवसाय मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.
दुस-या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीतून कंपनीला ३७ लाख डॉलर्सचे उत्पन्न मिळाले. यात ‘ब्लॅकबेरी ७’ या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री केली. मात्र ‘ब्लॅकबेरी १०’ला अपेक्षित यश न मिळाल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत कंपनीकडे २.६ अब्ज डॉलर्स असून यामध्ये आधीच्या तिमाहीच्या तुलनेत मोठी घट झाली. दरम्यान, खर्चकपातीचे धोरण राबवणा-या ब्लॅकबेरीकडून निराशाजनक तिमाही निकालानंतर जगभरातील ४,५०० कर्मचा-यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक वृद्धी आवश्यक गोष्टींवर यापुढे भर दिला जाईल. जेथे ब्लॅकबेरीला मागणी आहे, अशा बाजारापेठांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे हेन्स यांनी सांगितले.