‘प्रमोद जठार जमीन चोर’ आदी गगनभेदी घोषणा देत आणि काळे झेंडे दाखवत प्रमोद जठारांना रामेश्वर रिफायनरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रामेश्वर-काठे येथूनच माघारी पाठवले.
विजयदुर्ग- ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘विरोध विरोध रिफायनरीला विरोध’, ‘चोर चोर, जठार चोर’, ‘आंब्याच्या डांगीवर बसलाय मोर, प्रमोद जठार जमीन चोर’ आदी गगनभेदी घोषणा देत आणि काळे झेंडे दाखवत विजयदुर्गकडे येणा-या प्रमोद जठारांना रामेश्वर रिफायनरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रामेश्वर-काठे येथूनच माघारी पाठवले. प्रमोद जठारांनी रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिल्याने रामेश्वर, गिर्ये येथील लोकांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या होत्या. त्यामुळे जठारांना या भागात पाऊल ठेवू देणार नाही, असा निर्धार रामेश्वर तसेच गिर्ये भागातील लोकांनी केला होता.
जागतिक हेलियम दिन असल्याने तसेच यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विजयदुर्गमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवारी आयोजित केल्याने दुपारी १२ च्या दरम्यान प्रमोद जठार येत होते. रामेश्वर रिफायनरी विरोधी समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच आबालवृद्ध, महिला, ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून आणि जठारांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांना आल्यापावली परत पाठविले.
विजयदुर्गला हेलियम दिनाच्या कार्यक्रमाला जठार येणार याची माहिती असल्याने रामेश्वरमधील ग्रामस्थांनी आधीपासूनच निषेधाची तयारी केली होती. शासनाने नाणार ग्रीन रिफायनरीची घोषणा केली आणि येथील पारंपरिक शेतकरी, आंबा बागायतदार, मच्छीमार लोकांना तीव्र धक्का बसला. या प्रकल्पअंतर्गत रामेश्वर, गिर्ये तसेच राजापूर तालुक्यातील १६ गावांना झळ बसणार आहे. प्रदूषण करणा-या या प्रकल्पामुळे येथील हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये हा संपूर्ण परिसर भविष्यात पर्यटनदृष्टय़ा प्रगतीपथावर असून पर्यटनाच्या माध्यमातून येथे अनेक रोजगार निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच शासनाने हा प्रकल्प येथील जनतेच्या माथी लादून येथील लोकांची क्रूर चेष्टा केल्याची भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळे यापूर्वी अनेक माध्यमातून शासनाला विरोध करूनही शासन कुठलीही दखल घेत नाही. लोकांचा विरोध असेल तर शासन हा प्रकल्प लादणार नाही अशी भाषा राज्याचे मुख्यमंत्री करतात. मात्र रिफायनरीला समर्थन करणारे प्रमोद जठार यांच्यासारखे त्यांच्याच पक्षाचे नेते लोकांचा विरोध त्यांना का दाखवून देत नाहीत असा प्रश्न लोकांमधून उपस्थित केला जात होता.
दरवर्षी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये होणा-या ‘हेलियम डे’ला विरोध नाही, पण विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधाची स्थानिकांची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या प्रकल्पाची पाठराखण करणारे माजी आ. प्रमोद जठार यांना काळय़ा फिती लावून, काळे झेंडे दाखवून स्थानिकांनी निषेध केला. नागरिकांचा संताप, विरोध लक्षात येताच जवळपास तासभराच्या नाटय़ानंतर जठारांनी शरणागती पत्करली आणि आपली गाडी माघारी फिरवली.
यावेळी रामेश्वरचे सरपंच विनोद सुके, महंमदअली मुकादम, सुरेश केळकर, मिलेश बांदकर, जि.प.सदस्या वर्षा पवार, सुरेश पुजारे, नासीर मुकादम तसेच रामेश्वर, गिर्ये, विजयदुर्ग भागातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.