नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरियॉसिटी या रोव्हरने तेथील खडकांवरील धूळ साफ करण्यासाठी पहिल्यांदाच एका ब्रशचा वापर केला आहे.
नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरियॉसिटी या रोव्हरने तेथील खडकांवरील धूळ साफ करण्यासाठी पहिल्यांदाच एका ब्रशचा वापर केला आहे. या वापराबरोबरच या रोव्हरमध्ये असलेल्या अवजारांचा पहिल्यांदा वापर करण्याचा टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या एका सपाट खडकाची सखोल तपासणी केली जाणार असल्याने त्यावर एका विशिष्ट पट्टय़ात असलेली धूळ रोव्हरने धूळ काढणा-या यंत्राने काढून टाकली, अशी माहिती नासाने दिली आहे.
हे यंत्र म्हणजे मोटर लावलेले तारांचे ब्रश आहे आणि खडकांच्या निवडक पृष्ठभागाचीच स्वच्छता करता येईल, अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे खडकाचे अधिक बारकाईने निरीक्षण करता येते. जर खडकावर धूळ असेल तर त्याची माहिती योग्य प्रकारे मिळवता येत नसल्याने या यंत्राचा वापर करून ही माहिती मिळवली जाणार आहे.
एखाद्या खडकाच्या विशिष्ट पृष्ठभागाला लक्ष्य करून त्यावरील धूळ काढणे सोपे नसते. अतिशय काळजीपूर्वक ‘येलोनाइफ बे’ परिसरात ‘एकविर-१’ नावाचे हे लक्ष्य निवडण्यात आले व त्यावरील धूळ या ब्रशने काढून टाकण्यात आली.
धूळ काढण्याचे काम झाल्यावर यापुढील काळात तेथील खडकांना छिद्रे पाडण्याचे काम सुरू करण्याचा नासाच्या शास्त्रज्ञांचा विचार आहे.
त्यासाठीच या ब्रशचा वापर करून योग्य ते लक्ष्य साध्य करता येते का हे तपासण्यात आले, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. हे यंत्र हनीबी रोबोटिक्सने तयार केले असून यापूर्वीच्या स्पिरिट व ऑपॉच्र्युनिटी या रोव्हरसाठीदेखील अशी यंत्रे तयार करण्यात आली होती.